काशिनाथ वाघमारे
सोलापूर : घरांच्या पाठीमागील बोळातून घरात प्रवेश करून चोरट्यांनी बेडरूमचा व शेजारच्या खाेलीचे कुलूप कटावणीने उचकटून कपाटातील २ लाख ८६ हजारांचे सोने- चांदीचे दागिने पळवल्याची घटना रविवार, ३० जून रोजी पहाटे २:४५ वाजता निदर्शनास आली.ही घटना बार्शी तालुक्यात आगळगाव येथे घडली आहे. याबाबत रामचंद्र साहेबराव गायकवाड (रा. आगळगाव ता. बार्शी) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गायकवाड यांच्या घरातील सर्वजण जेवण आटोपून दोन्ही मुले शेतात झोपण्यासाठी गेली. फिर्यादी, पत्नी व मुलगा अजित व त्याची पत्नी हे बेडरूम शेजारच्या खोलीत झोपी गेले. ३० जूनच्या पहाटे २:४५ च्या सुमारास मोबाइलवर शेजारचे बाळासाहेब माने यांचा कॉल आला.
घरात चोरी झाल्याचे समजताच बेडरूममध्ये डोकावता सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटातून दागिने चोरट्यांनी पळवलेले निदर्शनास आले. १ लाख २० हजारांचे तीन जोड, सोन्याच्या पाटल्या, ४० हजारांचे एक तोळ्याचा नेकलेस, ८० हजारांच्या चार सोन्याच्या अंगठ्या, ४० हजारांचे दोन लाॅकेट, लहान मुलाचे चांदीचे कडे, वाळे, बिनल्या तीन भार असा एकूण २ लाख ८६ हजांरांचा ऐवज खोरट्यांनी पळवला.चोरटा घरातून जाताना दिसला..
शेजारचे बाळासाहेब माने हे रविवारी पहाटे लघुशंकेसाठी उठले आणि बाहेर डोकावले असता गायकवाड यांचा दरवाजा उघडा दिसला. त्याचवेळी एक ३० ते ३५ वयोगटातील चोरटा बाहेर येत असताना दिसला. त्याला हटकले आणि 'सुजित आहे का', असे विचारताच तो तेथून पळाला. माने यांनी तत्काळ गायकवाड यांच्याशी संपर्क साधून जागे केले. यावेळी खोलीचे कुलूप तुटलेले दिसले. त्या ठिकाणी एक लोखंडी कटवणी पडलेली दिसली.