काशिनाथ वाघमारे
सोलापूर : अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो भरधाव वेगाने डिव्हायडरवर चढून पलटी झाला. या अपघातात या वाहनावर मजूर म्हणून काम करणारा जागीच ठार झाला तर चालकासह दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना मोहोळ तालुक्यात यावली येथील पाचनाला परिसरात १ जुलै रोजी पहाटे पाच वाजेदरम्यान घडली.
महादेव राजाभाऊ वाघमोडे (वय २७, रा अंजनगाव, ता. माढा) असे जखमी होऊन मरण पावलेल्या मजुराचे नाव असून टेम्पोचा चालक व सोमनाथ जाधव जखमी झाले. पोलिस सूत्रांकडील माहितीनुसार मयत महादेव वाघमोडे हा मोहोळ येथील सुदर्शन सुभाष गायकवाड यांच्या टेम्पोवर मजुरी करण्यासाठी जात होता. ३० जून रोजी अंजनगाव येथे जाऊन सुदर्शन गायकवाड यास महादेव यांच्या मालकीच्या टेम्पो (एमएच १२ / सीटी ७७७१) वर कामासाठी आणले होते. टेम्पोमधून सुदर्शन गायकवाड हा वाळूची अवैध वाहतूक करीत होता. त्या वाहनांवर प्रमोद महादेव जाधव (रा. पाची पट्टा, मोहोळ) हा चालक गाडी चालवित होता.
१ जुलै रोजी पहाटे २.४५ वाजेच्या सुमारास वाळूची गाडी ही पुणे- सोलापूर महामार्गावर मोहोळच्या दिशेने येत असताना टेम्पोचालक प्रमोद जाधव याने वाहन रस्त्याचे मधोमध डिव्हायडरवर चढवला आणि ते पलटी झाला. या अपघातात महादेव वाघमोडे हा गंभीर जखमी होऊन मरण पावला तर टेम्पोचा चालक व सोमनाथ जाधव हे जखमी झाले. या प्रकरणी खेलोबा राजाभाऊ वाघमोडे यांनी मोहोळ पोलिसात फिर्यादी दिली असून टेम्पो मालक सुदर्शन सुभाष गायकवाड व टेम्पोचालक सोमनाथ सुखदेव जाधव (दोघेही रा. मोहोळ) विरुद्ध मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक फौजदार जाेतिबा पवार करीत आहेत.