- आप्पासाहेब पाटील
सोलापूर/कुरूल : मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना चेअरमनपदी विश्वराज महाडिक तर व्हा. चेअरमनपदी सतिश जगताप यांची अविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी जाहीर केले. दरम्यान, कै. भिमराव महाडिक यांनी कारखान्यांची स्थापना केली. त्यानंतर त्यांचे सुपुत्र खा. धनंजय महाडिक हे कारखान्याचा कारभार पाहत होते. आता खा. धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक हे अमेरिकेत शिक्षण घेऊन थेट मोहोळ तालुक्यातील भीमा कारखान्याची सुत्रे हाती घेतली आहे.
निवडीनंतर भीमा - लोकशक्ती परिवाराच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला . निवडीनंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या समवेत भिमाचे नूतन चेअरमन, व्हॉईस चेअरमन व संचालक मंडळ संस्थापक चेअरमन कै. भीमरावदादा महाडिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेत आणि पुष्पहार अर्पण केला.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले महाडिक यांचे कौतुकधनंजयराव भीमातील विजयाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा . खर तर निवडणूक लागायला नको होती . त्यांनी निवडणूक लावून चूक केली आहे . तुमच्या आणि विश्वराज च्या वाटचालीस शुभेच्छा असं सांगत महाराष्ट्र भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राज्यसभा खासदार आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांचे कौतुक केले आहे .
खासदार धनंजय महाडिक यांनी भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विरोधी गटातील भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या सीमारेषेवर असलेले माजी आमदार राजन पाटील यांच्या पॅनलचा मोठ्या फरकाने पराभव करून आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे . निवडणुकी आधी महाडिक यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सहकारी संस्थेवर निवडणुकीचा बोजा पडू नये आणि पर्यायाने सभासदांना त्याची झळ बसू नये यासाठी ही निवडणूक बिनविरोध करावी यासाठी प्रयत्न केले होते. खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही माजी आमदार परिचारक आणि पाटील यांना बिनविरोध करण्यासाठी सांगितले होते, मात्र अखेर ही भिमाची निवडणूक लागली. वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपांचे घमासान झाले. माजी आमदार राजन पाटील यांच्या त्या व्यक्तव्याने ही निवडणूक राज्यभरात गाजली. दरम्यान जिल्ह्यातील दामाजी आणि विठ्ठल आणि अहमदनगर जिल्ह्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर सत्तांतर झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर खासदार धनंजय महाडिक यांनी अगोदरच सांगितले त्याप्रमाणे या निवडणुकीत जवळपास सहा हजार पाचशे मतांच्या फरकाने ही निवडणूक महाडिक यांनी जिंकून भिमाचे मैदान मारले होते
आता खासदार महाडिक यांनी मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील राजकारणात लक्ष घालायचे धोरण आखले आहे. या पार्श्वभूमीवर महाडिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी फडणवीस यांनीही महाडिक यांचे विजयाबद्दल कौतुक करत त्यांचा सत्कार केला. आगामी वर्षात भीमा साखर कारखाना इथेनॉल आणि डिस्टलरी प्रकल्प उभारणार असल्याचे महाडिक यांनी फडणवीस यांना सांगितले .