सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील हरणा नदीत वाहून गेलेत्या तरूणाच्या 'लोकमत' बातमीची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सकाळी घेतली. त्यानंतर तत्काळ त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना कॉल केला. दुर्घटनेविषयी माहिती जाणून घेऊन दोन दिवसांत त्या पुलासंदर्भातील प्रस्तावाची फाईल मला मंत्रालयात पाठवा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील एक तरूण हरणा नदीत वाहून गेला. दरम्यान, त्या तरूणाचा मृतदेह 36 तासानंतर सापडला. यापूर्वीही हरणा नदीत पाच ते सहा जण वाहून जाऊन मृत्यूमुखी पडले होते.
या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी शासकीय रूग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करून त्वरीत पुल करण्याची मागणी केली. या घटनेचे वृत्त बुधवारी 'लोकमत'च्या अंकात प्रसिध्द झाले. ही बातमी शिंदे यांचे विश्वासू सहकारी मनिष काळजे यांनी मुख्यमंत्र्यांना व्हॉट्सअॅपवर पाठवली. ही बातमी वाचून मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना कॉल केला.
घटनेची विषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर 'संबंधित ग्रामस्थांना जावून समक्ष भेटा. त्याच्या अडीअडचणी जाणून घ्या. यापुढे आंदोलन करण्याची गरज नाही. दोन दिवसात पुलाचे काम सुरू करतो, असे सांगा अन् मला त्या पुलासंदर्भातील फाईल दोन दिवसाच्या आत मंत्रालयात पाठवून द्या,' असे आदेश दिले. यावेळी कॉन्फरन्स कॉलवर मनिष काळजे हेही लाईनवर होते.