आप्पासाहेब पाटील,सोलापूर : मरिआई चौकातील खाजगी कंपनीच्या जागेत असलेली शंभर वर्ष जुनी अशी लक्ष्मी-विष्णू मिलची चिमणी गुरूवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पाडण्यात आली. सोलापूरचा वारसा, ऐतिहासिक ओळख देणारी चिमणी पाडल्याची खंत सोलापुरकरांनी व्यक्त केली.
दरम्यान, सध्याच्या महापालिकेच्या एक्झीबिशन सेंटर परिसरात असलेल्या लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेवरील चिमणी धोकादायक स्थितीत होती. या चिमणीचं अलीकडेच कंपनीनं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं. चिमणी नैऋत्य दिशेला ३ फूट कलली होती. कंपनीनं हा अहवाल पालिकेस दिला. पालिकेनेही यावर ऑडिट केलं तेव्हा ही चिमणी पाडावी अशी नोटिस कंपनीला दिली होती. कंपनीनं मुंबईच्या बांधकाम पाडणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून ही चिमणी गुरूवारी पाडली. सकाळी १० वाजता एक मोठा जेसीबी लावून प्रथम पायाचा भाग खोदला आणि १२ च्या सुमारास ही चिमणी जमीनदोस्त झाली.
या मैदानाजवळ सभा, प्रदर्शन विविध कार्यक्रम होत असतात. यामुळे ही धोकादायक झालेली चिमणी पाडण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब करुन ती पाडण्यात आली आहे. यावेळी अग्नीशमन दल, रुग्णवाहिका, पोलिस, पालिका पथक बोलवण्यात आले होते. कोणतीही दुर्घटना न होता ती पाडण्यात आली.