सोलापूर : झोपडपट्टी क्रमांक १ व २, सोनियानगर, आम्रपाली चौक, रेवणसिद्धेश्वर झोपडपट्टी, विजापूर रोड, या भागातील ४०० रहिवाशांना रेल्वे विभागाकडून घर जागा पाडकामाबाबत नोटीस देण्यात आली होती. त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने ५ जूनपर्यंत कोणतेही पाडकाम न करण्याचे आदेश दिले आहेत.
नोटीस मिळालेल्यांपैकी जाकीर शेख, मौमुना पिरजादे यांच्यासह ९ जणांनी जिल्हा न्यायालयात ॲड. व्ही. एस. आळंगे, ॲड अमित आळंगे, ॲड. सविता बिराजदार, ॲड. राहुल गायकवाड यांच्या मार्फत अपील दाखल केले. या प्रकरणात रेल्वेने कोणतेही नैसर्गिक न्यायतत्त्व पालन न करता कोणतीही संधी न देता सदर पाडकाम काढून टाकण्यासंबंधीची नोटीस दिली होती.
हा आदेश संपूर्णत: बेकायदेशीर असून यदाकदाचित ही नोटिसीप्रमाणे कारवाई झाल्यास ४० वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाशांचे अतोनात व कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे, असा युक्तिवाद ॲड. अमित आळंगे यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर अहमद औटी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना नोटीस काढून दि. ५ जून २०२३ रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत आदेश केला. तोपर्यंत कोणतेही पाडकाम अथवा निष्कासन करण्याबाबतची कारवाई करू नये, असा मनाईचा आदेश दिला आहे. या प्रकरणात ॲड. व्ही. एस. आळंगे, ॲड. अमित आळंगे, ॲड. बिराजदार, ॲड. राहुल गायकवाड यांनी काम पाहिले.