सोलापूर : महिलांनो, तुम्ही जर प्रवासी वाहनातून प्रवास करीत असाल आणि जर तुम्हाला असुरक्षित वाटल्यास वाहनातील ‘पॅनिक बटण’ दाबत राहू नका. कारण तुमच्या मदतीला कोणीही येणार नाही. ही यंत्रणा केवळ नावालाच आहे. त्यामुळे एक तर तुमची सुरक्षा तुम्हीच करा किंवा इतरांची मदत मिळते का पाहा, नाही तर तत्काळ पोलिसांना फोन करा. कारण प्रवासी वाहनांत ‘पॅनिक बटण’ची सुरक्षा नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.
प्रवाशांची, विशेषत: महिलांची सुरक्षितता डोळ्यांसमोर ठेवून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व टॅक्सी, बसेस आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रवासी वाहनांमध्ये व्हीटीएस किंवा जीपीएस आणि पॅनिक बटण बसविण्याची सक्ती केली. या निर्णयाची अंमलबजावणी २०१८ पासून सुरू झाली.
----------
वाहन चालकालाच माहीत नाही पॅनिक बटण असते ते
प्रवासी वाहनात पॅनिक बटण आहे का? मदत मिळतेय का? याबाबत ‘लोकमत’च्या टीमने पाहणी केली असता, कोणत्याही प्रवासी गाडीत पॅनिक बटण आढळून आले नाही. काही चालकांना पॅनिक बटणाबाबत लोकमतच्या प्रतिनिधीने विचारले असता, ते काय असते? असा प्रतिसवाल प्रवासी वाहन चालकाने विचारला. यावरून प्रवासी वाहनात पॅनिक बटण नाही, त्याबाबतची माहितीही प्रवासी वाहनचालक व प्रवाशांना माहीत नसल्याचे सत्य समोर आले आहे.
-----------
पॅनिक बटण म्हणजे काय...
प्रवासी वाहनातून प्रवास करणाऱ्या महिलांना असुरक्षित वाटू लागल्यास किंवा सहप्रवासी किंवा गाडीच्या चालकाकडून गैरकृत्य केले गेल्यास मदत मागण्यासाठी ‘पॅनिक बटण’ वापरता येणार आहे. बटण दाबल्यानंतर संबंधित कंट्रोल रूमला माहिती मिळेल. तसेच, ‘व्हीटीएस’द्वारे ‘लोकेशन’देखील समजेल, असे सांगण्यात येते.
----------
प्रवासात असुरक्षित वाटल्यास काय कराल?
प्रवासात असुरक्षित वाटल्यास ११२ या क्रमांकावरून पोलिसांची मदत घेता येईल. त्याबरोबर कुटुंबातील सदस्यांनाही संपर्क साधून माहिती देता येईल. वाहन जर थांबत नसेल तर रस्त्यावरील इतर वाहनचालक, पादचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करावा.
-----------