- अरुण लिगाडे
सांगोला - राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनासाठी आलेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक बसल्यामुळे हेलिकॉप्टर काही केल्याने उड्डाण घेईना . पायलटच्या १० ते १५ मिनिटांच्या प्रयत्नानंतर अखेर हेलिकॉप्टर मधून महिला अधिकारी उतरल्या आणि हेलिकॉप्टरने दुपारी ३ च्या सुमारास आकाशात उड्डाण घेताच पायलट सह पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवात जीव आला. हा प्रकार आज शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास सांगोला महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर घडला.
राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज शनिवारी सांगोला येथील राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर त्यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांच्या निवासस्थानी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते विरोधी पक्षाच्या नेते मंडळीची निवेदने स्वीकारली. भोजनानंतर ते परत मुंबईला जाण्यासाठी सांगोला महाविद्यालयाच्या हेलीपॅड वर गेले.
त्या ठिकाणी हेलिकॉप्टरमध्ये पायलट, को पायलट, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अंगरक्षक यांच्यासह ८ लोक बसले होते. परंतु हेलिकॉप्टर काही केल्याने उड्डाण घेईना, पंख्याची पाते वेगाने फिरत असल्यामुळे हेलिपॅड वर धुरळा उडाल्याने कोणाच्या काहीच लक्षात येत नव्हते. हा प्रकार सुमारे १० ते १५ मिनिटे चालू होता. अखेर मंत्री महोदयाच्या हेलिकॉप्टर मधून महिला अधिकारी खाली उतरल्या आणि दुपारी ३ वाजून ७ मिनिटांनी हेलिकॉप्टर आकाशात झेपावले , तेव्हा कोठे पोलीस अधिकारी यांच्यासह नेते मंडळीच्या जीवात जीव आला.