सोलापूर : राज्यभर मुस्कान १३ अंतर्गत घरातून बेपत्ता झालेल्या मुलांना शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्याची मोहीम राबविली जात आहे. शहरातील अशोक चौकात अशाच एका मुलीस आणि तरुणाला संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आले. या दोघांना पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांचा ठावठिकाणा घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. जेलरोड पोलिस ठाण्याच्या मुस्कान पथकाने ही कामगिरी केली. किशोर (बदलेले नाव) (वय २०, सोलापूर), सरिता (बदललेले नाव) (वय १८, रा. भिवंडी, जि. ठाणे) अशी त्यांची नावे असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
जेलरोड पोलिस ठाण्यात दिनांक ०९.१२.२०२४ रोजी ऑपरेशन मुस्कान १३ अंतर्गत जेलरोड पोलिस ठाण्याकडून सपोनि जोत्स्ना भांबिष्टे, हवालदार चव्हाण, मपोलीस सय्यद, भुजबळ असे पथक नेमले आहे. सोमवारी ते ऑपरेशन मुस्कानदरम्यान कारवाई करीत असताना अशोक चौक परिसरात त्यांना एक तरुण व तरुणी संशयितरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. त्यांची सखोल चौकशी केली असता मुलाने त्याचे नाव सांगितले. तो खासगी नोकरी करीत असून, कोणालाही न सांगता घरातून आला नसल्याचे समजले. दोघांनाही जेलरोड पोलिस ठाणे येथे आणून रेकार्डवर तपासले असता किशोरची माहिती मिळाली. त्याच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर तरुणीस विश्वासात घेऊन विचारणा केली. तिने पालकांना न सांगता निघून आल्याचे सांगितले. भिवंडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिस चव्हाण व मुलीची आई रात्री उशिरात सोलापुरात पोहोचले असता तरुणीस त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी पथकाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
ऑपरेशन मुस्कान
पालक आणि मुलांमधील संवाद हरवत चालल्याने मुलं न सांगता बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच १५ ते २२ वयोगटातील मुलं-मुली बाह्य आकर्षणाला भुलून बेपत्ता होण्याची गुन्हे घडत असल्याने अशा प्रकारांवर आळा बसवा यासाठी पोलिसांकडून ऑपरेशन मुस्कान या मोहिमेद्वारे मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात येत आहे.