सोलापूर : आजीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर आरडाओरड करीत मोठमोठ्याने रडण्याचं नाटक करणाऱ्या नातवाचाच पोलिसांना संशय आला. आजी रजिया सलीम शेख (वय ७२, रा. विडी घरकूल, कुंभारी) हिच्या खूनप्रकरणी नातू शाहनवाज महेबूब शेख याला उचलले अन् पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. पत्नीवर संशय घेत भांडण काढणाऱ्या आजीचा त्याने खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.
रजिया सलीम शेख या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पार्किंगच्या शेजारी बॉन्ड रायटर म्हणून काम करीत होत्या. २५ जून रोजी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय बंद होते. तरीही रजिया शेख ही दर्ग्याला गेली, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दर्ग्यात दर्शन घेऊन ती बसत असलेल्या नेहमीच्या ठिकाणी गेली. तेथून ती गायब झाली होती. २७ जून रोजी सकाळी पडक्या इमारतीतून दुर्गंधी येत होती. तेथील एका इसमाने आत जाऊन पाहणी केली असता, रजिया शेख यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला, दोन मुलींसह नातेवाइकांनी रडण्यास सुरुवात केली. दरम्यान, नातू शाहनवाज शेख हाही मोठमोठ्याने रडण्याचे नाटक करत होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांना संशय आला, त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली. घरात काय वाद होता का? याची विचारणा केली. नातेवाइकांकडून घेतलेल्या माहितीवरून शाहनवाज हा नाटक करत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने मयत रजिया ही त्याच्या पत्नीचे चारित्र्य चांगले नसल्याबाबत लोकांना सांगत होती. तिच्याशी वारंवार भांडण करून नाहक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून त्याने खून केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
माती आणण्याच्या बहाण्याने नेले पडक्या खोलीत
रजिया शेख जिथे बसत होती, तेथील कॅन्टीनवर शाहनवाज शेख हा काम करत होता. सुट्टी असो नसो रजिया शेख ही दररोज पहाटे ५ वजता जिल्हाधिकारी कार्यालयातील दर्ग्यामध्ये येत होती. तेथून ती आपल्या जागेवर जाऊन साफसफाई करत होती. घटनेच्या दिवशी ती नेहमीप्रमाणे दर्ग्यात आली. तेव्हा शाहनवाज याने फोन केला व आपल्या जागेवर येण्यास सांगितले. रजिया जागेवर गेली तेव्हा त्याने तिला आतून माती आणू म्हणून पडक्या खोलीत नेले. दरम्यान, त्याच्या पत्नीवरून दोघांचे भांडण सुरू होते, माती काढण्यासाठी दोघे आत गेले. रजिया खाली वाकली असता, त्याने पडलेल्या कौलाने डोक्यात प्रहार केला. स्क्रू ड्रायव्हरने मानेवर वार केला, त्यामुळे ती जखमी होऊन खाली पडली. दोन ते तीन वेळा भोसकल्याने ती जागेवरच मरण पावली, असे पोलिसांनी सांगितले.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावला तपास
पोलीस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, अश्विनी भोसले, सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकांनी तपास लावला. शाहनवाज शेख याला मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायाधीशांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.