सोलापूर : बार्शी तहसील कार्यालयाच्या आवारातील कारागृहात दोन कैद्यात सुरू असलेले भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसाला आरोपींनी धक्काबुक्की करत गच्ची पकडून शासकीय कामात अडथळा केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत रात्री उशिरा पोलिस कॉन्स्टेबल सूरज मुलाणी यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी नितीन अनिल विधाते (वय ३६, रा.आगळगाव, ता. बार्शी) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नितीन विधाते हा बार्शी तालुका पोलिस स्टेशनचा आरोपी असून त्याच्याविरुद्ध भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो न्यायाधीन बंदीतील आरोपी असून तो सबजेलमध्ये आहे. त्याच्या बऱ्याकमध्ये इतर चार आरोपी होते. फिर्यादी कॉन्स्टेबल सूरज मुलाणी हे ड्युटीवर असताना त्यांना आतून भांडण सुरू असल्याचा आवाज आला. ते भांडण सोडवण्यासाठी गेले. दरम्यान त्या पोलिसांस ' तुझा काही संबंध नाही, तू बाजूला सरक ' म्हणत आरोपीने धक्काबुक्की करत मुलाणी यांची गच्ची पकडून शासकीय कामात अडथळा केला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मुळीक करत आहेत.