- संताजी शिंदे सोलापूर - भारत हा असा देश आहे, जेथे हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई, बौद्ध यासह अन्य विविध धर्माचे लोक राहतात. सर्वधर्म समभाव हीच खरी भारताची ओळख असून, या देशाला जागतीक स्तरावर बलवान बनवण्यासाठी सर्वांमध्ये प्रेम व एकोपा असला पाहिजे असे मत, जाने निजामी हैद्राबाद येथील असोसिएट प्रोफेसर मुफ्ती सय्यद अहमद घोरी नक्स बंदी यांनी व्यक्त केले.
पानगल येथील शाही आलमगीर ईदगाह येथे रमजान ईद निमित्त आयोजित करण्यात आलेल्या नमाज पठणा दरम्यान ते बोलत होते. पानगलच्या मैदानावर सकाळी ८.३० वाजता नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर ते समस्त हिंदू मुस्लिम बांधवांना उद्देशून बोलताना म्हणाले की, सर्व धर्मीय देशाची जी ओळख आहे ती कायम राहिली पाहिजे. सध्याच्या युगात शिक्षणाशिवाय विकास होणे शक्य नाही. जगातील प्रत्येक देशाने शिक्षणावर भर दिला आहे. आपल्या ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे, वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. सर्वांसोबत चांगले वागले पाहिजे.
सकाळी ८ वाजताच मैदानावर मुस्लिम बांधवांनी येण्यास सुरूवात केली. चटई, बेडशी खाली आंथरून नमाजाच्या स्थितीत बसत होते. ८.३० वाजता मुफ्ती सय्यद अहमद घोरी यांनी नमाजाला सुरूवात केली. पांढरे शुभ्र कपडे परिधान करून हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.
पावसासाठी केली दुवा- नमाज पठना दरम्यान मुफ्ती सय्यद अहमद घेरी यांनी यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडू दे अशी याचना केली. आमच्याकडून काही पाप झाले असल्यास आम्हाला माफ कर, भारतामध्ये सुख समृद्धी निर्माण होऊ दे. शांतता नांदू ने अशी प्रार्थना केली. - ईद हा शांतता व मानवतेचा संदेश देणारा सण असून हिंदू मुस्लिम बांधवांनी भाईचारा कायम ठेवत देशाच्या उज्वल भवितव्यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही योळी केले.