सोलापूर : शेकडो भाविक ज्ञानोबा तुकाराम, माऊली.. माऊलीचा गजर अन् जयघोषात टाळ- मृदंगाच्या तालावर माघवारी पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण कुरुल (ता. मोहोळ) येथे पार पडले. या रिंगण सोहळ्याने कुरुलकरांच्या डाेळ्याचे पारणे फेडले.तिऱ्हे मार्गे पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या दिंड्यांचे अखिल भाविक वारकरी मंडळ, सोलापूरच्या वतीने एकत्रीकरण करून पाटकर वस्ती (कुरुल) येथे दरवर्षीप्रमाणे गोल रिंगण सोहळा पार पडला.
सकाळी कुरुल ग्रामस्थांच्या वतीने या पालखीचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सडा रांगोळी काढून स्वागत केले. प्रारंभी रिंगणाचे अश्व मुख्य स्थळावर आणले. कुरुल भजनी मंडळाच्या वतीने वीणेकरी सौदागर जाधव, सरपंच शीलाताई माने, तंटामुक्तीचे अध्यक्ष शत्रुघ्न जाधव, महादेव माळी, माणिक पाटील यांच्या हस्ते पालखी व अश्वाचे पूजन झाले. यावेळी दिंडी प्रमुख व वीणेकरी महाराजांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार झाला. त्यानंतर ज्ञानोबा - तुकाराम या नामाच्या गजरात रिंगण पूर्ण झाले आणि पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.यावेळी ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, उपसरपंच पांडुरंग जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, डॉ.दत्तात्रय कदम, कारभारी जाधव, माजी पोलिस अधीक्षक शशिकांत माने, प्रा. माऊली जाधव, बाबासाहेब जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सीताराम लांडे, गहिनीनाथ जाधव, बाळासाहेब लांडे, भारत जाधव, सुनील आंबरे, रामेश्वर पाटकर, प्रमोद लांडे उपस्थित होते.अश्व धावताच पायधूळ मस्तकी लावलीया मैदानावर प्रथम ध्वजधारीपासून रिंगण झाले. त्यानंतर डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिलांचे रिंगण झाले. त्यापाठोपाठ मृदंग व वीणेकरी रिंगण झाले आणि शेवटी आषाढी सोहळ्यातील माऊलींच्या पालखीचे दोन अश्व धावले. भक्तांनी त्यांचे मनोभावे दर्शन घेतले आणि पायधूळ मस्तकी लावली.