लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : एकीकडे परराज्यातील उत्पादनाची सोलापूरच्या मार्केटमध्ये रेलचेल असताना येथे पर्यावरणपूरक असलेल्या मातीपासून बनविण्यात येणाऱ्या आकाशकंदिलांची परराज्यातील ग्राहकांना भुरळ पडली आहे. पुण्या-मुंबईसह शेजारच्या आंध्र, कर्नाटक, तेलंगणामध्येही मागणी वाढली आहे. सोलापुरी चादरीप्रमाणे स्वतःची नवी ओळख इथले कारागीर निर्माण करीत आहेत.
येथील मातीपासून तयार केले जाणारे आकाशदिवे त्यावरील सुंदर नक्षीकाम, वैविध्यपूर्ण आकारातील उपलब्धता, मनमोहक रंगसंगती, आतील बाजूस चमचमणारे बहुरंगी एलईडी दिवे, सहज टांगून ठेवता येईल अशी रचना, जपली जाणारी पर्यावरणपूरकता यामुळे स्थानिक बाजारपेठेसह परराज्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.
सध्या राज्यातील पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील मराठवाडा, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि शेजारच्या आंध्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांतून आकाशदिव्यांची मागणी वाढत आहे. दीपावलीपूर्वी दोन महिने अगोदर तयार करण्यात येणारे आकाशकंदील आता सहा महिने अगोदरच सुरू करावे लागत आहेत. येथील कुंभार समाजानेही कात टाकली असून, परंपरागत फिरत्या चाकांऐवजी यांत्रिक पद्धतीने उत्पादन सुरू केले आहे, असे विकास कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
परराज्यात सोलापुरी मातीचा ठसाशहरातल्या कारागिरांनी आकर्षक रंगसंगती सोबत आकारात विविधता आणत नवनिर्मिती केली. परप्रांतीयांच्या उत्पादनाला शहरातून हद्दपार केले. सोलापूरच्या मातीच्या आकाशकंदिलाचे ब्रँड निर्माण करीत परराज्यातही आपला ठसा उमटवला आहे.
असे तयार होतात आकाशकंदीलयेथील शेतातील काळ्या चिकणमातीत चिवटपणा येण्यासाठी कोल्हापुरी तांबडी माती, राजस्थानी पुफरा माती, फरशांची पावडरयुक्त माती ठरावीक प्रमाणात मिसळली जाते. मातीच्या गोळ्याला मशीनवर आकार दिल्यानंतर ते कच्चे असतानाच त्यावर नक्षीकाम केले जाते. त्यानंतर भट्टीत भाजून ते अडकवण्यासाठी लोखंडी तार बांधण्यात येते. रंगरंगोटी करून मण्यांची सजावट केली जाते आणि विक्रीसाठी सज्ज करण्यात येतात. त्याचे वजन २०० ते ६०० किलोग्रॅम इतके असते. आतील बाजूस एलईडी दिव्याची सोय असते. नारळ, गोलाकार, लंब गोलाकार, चौकोनी, षटकोनी आकारात तयार करण्यात येतात.