सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यासोलापूरच्या पथकाने मंगळवारी (दि. १४ ) शहर परिसरात दोन मोटरसायकलीवरुन हातभट्टी दारुच्या वाहतूकीचा गुन्हा नोंदविला असून २२० लिटर हातभट्टी दारु व २ दुचाकी वाहने या कारवाईत जप्त करण्यात आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध हातभट्टी दारु निर्मिती व वाहतूकीवर विशेष लक्ष ठेवले जात असून फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत विभागाने २ हजार तीनशे लिटर हातभट्टी दारु, १५ हजार लिटर रसायन, २ चारचाकी, १ रिक्षा व १५ दुचाकी वाहने दारुबंदी गुन्ह्यात जप्त केली आहेत
याच मोहिमेअंतर्गत मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दुय्यम निरिक्षक सुरेश झगडे यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर हैद्राबाद रोडवरील चंदनकाट्यासमोरील रोडवर पाळत ठेवली असता काशिनाथ सोमलू राठोड (वय ४८ वर्षे, रा. मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) या इसमास त्याच्या होंडा मोटरसायकल क्र. एमएच १३ सीसी ९१६३ दुचाकीवरुन दोन रबरी ट्यूबमध्ये १०० लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करतांना अटक केली. त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किंमतीसह पन्नास हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एका अन्य कारवाईत भरारी पथकाचे निरिक्षक सुनिल कदम यांनी सोलापूर हैदराबाद रोडवर एका होंडा शाईन मोटरसायकल क्र एमएच १३ बीएक्स २३८२ या दुचाकीवरुन दोन रबरी ट्यूबमधून १२० लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करतांना विलास बाबू राठोड, वय ४३ वर्षे, रा. मुळेगाव तांडा या इसमास अटक करुन त्याच्या ताब्यातून सहासष्ट हजार दोनशे किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सुनिल कदम, दुय्यम निरिक्षक सुरेश झगडे, सुनिल पाटील, जवान नंदकुमार वेळापुरे, प्रकाश सावंत व वाहनचालक मारुती जडगे यांनी पार पाडली.