सोलापूर : एमए योगा अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षातील हटयोग या विषयाचा सोमवारी पेपर होता. सकाळी ११ वाजता सारे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी विद्यापीठातील परीक्षा हॉलमध्ये जमले. ११ ते दोन या वेळेत पेपर नियोजित होता. १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत विद्यार्थ्यांच्या हाती पेपर मिळालाच नाही. त्यामुळे विद्यार्थी नाराज होऊन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्याकडे तक्रार केली.
वेळेत हटयोगचा पेपर न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी पेपरवर बहिष्कार टाकला. वेळ वाढवून देणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितल्यानंतरही विद्यार्थ्यांनी बहिष्काराचा हट्ट धरला. अखेर पेपर न देताच विद्यार्थी विद्यापीठातून परतले. सोमवारपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांना सुरुवात झाली. हटयोग या विषयाचा पेपर देण्यासाठी २३ विद्यार्थी सोमवारी परीक्षा केंद्रावर आले. ११ वाजता हॉलमध्ये येऊन बसले. सुरुवातीला पेपर अर्धा तास उशीर होईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर बारापर्यंत पेपर दिला गेलाच नाही. त्यामुळे विद्यार्थी गोंधळले. काही विद्यार्थी संताप व्यक्त करत हॉल बाहेर आले. त्यानंतर १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत पेपर मिळालाच नाही. त्यामुळे सारेच विद्यार्थी परीक्षा हॉल बाहेर येत रोष व्यक्त केला.