सोलापूर : ऑनलाईन शॉपिंगद्वारे मागवलेल्या वस्तू घरपोच देऊन त्यातून मिळालेली १३ लाख ८० हजार ९९० रुपये रक्कम कंपनीकडे न पाठवता सुपरवायझरनं स्वत:साठी वापरली. विभागीय व्यवस्थापक ईश्वर नवनाथ शिंदे (वय- २९, रा. कासेगाव, ता. पंढरपूर ) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदविली. या प्रकरणी सुपरवायझर सुजितकुमार अशोक बिराजदार (वय ३१, रा. सुलेरजवळगे, ता. अक्कलकोट) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
शहरातील पुणे-सोलापूर रोडलगत बाळे येथे एनटेक्स ट्रान्सपोर्टेशन प्रा. लि. पुणे या कंपनीचे शाखा आहे. या कंपनीमध्ये फिर्यादी ईश्वर नवनाथ शिंदे (वय २९) हे विभागीय व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. त्यांच्या अधिपत्याखाली सोलापूर, पंढरपूर, बारामती, दौंड, इंदापूर हा विभाग आहे. बाळे शाखेत सुपरवायझर म्हणून सुजित बिराजदार हा काम पाहतो. या शाखेत ॲमेझॉन ऑनलाईन शॉपिंग केलेल्या लोकांचा माल हा बाळे येथील कार्यालयात येत असे. तो पुढे सोलापूर शहरात त्या ऑनलाईन शॉपिंग केलेल्या साहित्या वाटप करण्यासाठी सुपरवायझरच्या हाताखाली डिलिव्हरी बॉय काम करायचे. डिलिव्हरी बॉय ऑनलाईन शॉपिंग केलेल्या लोकांकडून मिळालेले पैसे सुपरवायझरकडे जमा करायचे. मात्र सुपरवायझर बिराजदार यानी ती रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा करायची असते मात्र त्याने तसे न करता ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२३ या चार दिवसात जमा झालेली १३ लाख ८० हजार ९९० ही रक्कम स्वत:साठी वापरुन कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने करीत आहेत.
लाखोंचं घबाड मिळाल्यानं सुपरवायझर फरार
३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या चार दिवसामध्येच तब्बल १३ लाख ९० हजार ९९० रुपयांचं घबाड मिळाल्यानं सुपरवायझर सुजितकुमार बिराजदार हा फरार झाला आहे. त्याच्या पत्त्यावर चौकशी केली असता तो गायब झाल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले.