सोलापूर : सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीची मोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील सहा गावांची मोजणी झाल्यानंतर काम पूर्ण होणार आहे. जानेवारी २०२३ मध्ये कामाचे टेंडर निघणार असून, एप्रिल २०२३ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
सध्या युद्धपातळीवर सुरू असून महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या तुलनेने सोलापूर जिल्ह्यांतील मोजणीचे काम अधिक वेगाने होत आहे. सोलापूर जिल्ह्यात अहमदनगर-सोलापूरच्या सीमेपासून नागेवाडी येथून महामार्गाची सुरुवात होणार आहे. हा मार्ग बार्शी तालुक्यातील १५, दक्षिण सोलापूर ४ आणि अक्कलकोट तालुक्यातील १६ अशा एकूण ३५ गावातून सुमारे ९३ किलोमीटर अंतरातून हा महामार्ग जात आहे. शेवटी हा मार्ग अक्कलकोट तालुक्यातील दुधणी येथून कर्नाटक राज्यात जात आहे. महामार्गासाठी तीन तालुक्यातील २९ गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील सहा गावांची मोजणी पावसामुळे राहिली आहे. ही मोजणी जुलै अखेर पूर्ण होणार आहे.
मोजणी पूर्ण झाल्यानंतर तत्काळ भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये महामार्गाच्या कामाचे टेंडर निघणार आहे, त्यानंतर मात्र एप्रिल २०२३ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. अडीच वर्ष म्हणजे २०२५ अखेर महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम केले जात आहे.
महिना अखेरपर्यंत मोजणी पूर्ण होईल त्यानंतर तत्काळ भूमी अभिलेख कार्यालयाकडून संपादनाची प्रक्रिया सुरू होईल. यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सतत पाठपुरावा करीत आहेत. ९ ते १० महिन्यात कामाला सुरुवात होईल, त्या अनुषंगाने कामकाज सुरू आहे.
सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.
सुरत - चेन्नईपाठोपाठ रिंगरूटच्या कामाचा शुभारंभ
सुरत - चेन्नई ग्रीन कॉरिडॉरच्या पाठोपाठ याच महामार्गाला जोडणाऱ्या रिंगरूटच्या कामाचा ऑगस्ट २०२३ मध्ये शुभारंभ होण्याची शक्यता आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी किंवा बोरामणी येथून रिंगरूटच्या कामाला सुरुवात होईल. लवकरच मोजणी सुरू होणार असून, त्यानंतर जमीन हस्तांतरणाचे काम सुरू होईल. मुस्ती, दर्गनहळ्ळी, कुंभारी, होटगी, फताटेवाडी, यत्नाळ, मद्रे गावातून हा रस्ता हत्तूर येथे सुरत-चेन्नई महामार्गाला येऊन जोडला जाणार आहे. बोरामणी, कासेगाव, उळे, तरटगाव, मार्डी, बाणेगाव, कारंबा, गुळवंची, खेडमार्गे केगाव येथील सुरत-चेन्नई महामार्गाला जोडला जाणार आहे. ५० किमीचा सहा पदरी मार्ग १८ गावातून जाणार आहे.