सोलापूर : अमरनाथ, वैष्णवी, काश्मीर दर्शन घडवून आणतो असे सांगून पाच लाख ६६ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नितीन पांडगळे, सचिन पांडगळे (नितीन टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स, टेंभूर्णी) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोघांनी देवदर्शनासाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. लोकांना सहलीची माहिती दिली होती. नितीन पांडगळे हा सुवर्णा हनुमंत पाटील (वय ५१ रा. उमा नगरी, मुरारजी पेठ सोलापूर) यांच्या ओळखीचा होता. यापूर्वी त्याने अशाच पद्धतीची सहल घडवून आणली होती, त्यामुळे नितीन पांडगळे याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता. पुन्हा त्यांनी देवदर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला होता. २२ जून २०१९ रोजी नितीन टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपनीला पैसे भरले होते.
पैसे परत केले नाहीत
सोलापुरातून एकूण ४८ प्रवाशांनी १४ दिवसांच्या देवदर्शनासाठी सहलीचे बुकिंग केले होते, मात्र देवदर्शनाला घेऊन न जाता टाळाटाळ केली. वारंवार विचारणा केली असता प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पैशाची मागणी केली असता ते परत केले नाहीत. या प्रकरणी सुवर्णा पाटील यांनी फिर्याद दिली असून तपास पोलीस नाईक पैकेकरी करीत आहेत.