सोलापूर/मंगळवेढा : आंधळगाव येथील एका ग्रामसेवकाचे बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील फिर्यादी जमीर मुलानी हे मंगळवेढा पंचायत समितीकडे ग्रामसेवक म्हणून नोकरीस आहेत. शनिवारी (दि. २६) फिर्यादी व त्यांची पत्नी व दोन मुले सोलापूर येथे घरगुती कार्यक्रमानिमित्त गेले होते. तर आई, वडील व भावाची मुलगी हे दि. २७ रोजी सकाळी ११ वाजता घराला बाहेरून कुलूप लावून शेताकडे गेले होते. सायंकाळी ७ वाजता ते पुन्हा घरी आले तेव्हा चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
चोरट्याने भरदिवसा घर फोडून कपाटातील एक लाख ५० हजार रुपयेे किमतीचे सोन्याचे गंठन तसेच ३० हजार रुपये रोख रक्कम असा एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.