दीपक दुपारगुडे, सोलापूर: तांबवे (टें) (ता. माढा) गावातील माणिक कोंडिबा खटके-पाटील यांच्या निधनानंतर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ खटके व त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत पाच दिवसांचे सुतक व दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण गावानेच आता गावातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहा किंवा तेरा दिवसांचा दुखवटा न पाळता फक्त पाच दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या ग्रामसभेत ठरावही पारित करण्यात येणार आहे.
१५ एप्रिल रोजी माणिक कोंडिंबा खटके-पाटील यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुली व नातवंड असा परिवार आहे. तांबवे गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ खटके- पाटील यांचे ते चुलते तर नितीन खटके-पाटील यांचे आजोबा होत. १७ एप्रिल रोजी तिसऱ्या दिवसाचा अर्थात सावडण्याचा विधी पार पडला. यावेळी कै. माणिक कोंडिबा खटके-पाटील यांच्या कुटुंबीयांनी व नागनाथ खटके-पाटील यांनी दहा दिवसांऐवजी पाच दिवसांचे सुतक अथवा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला. यानंतर तांबवे गावातील सर्व प्रमुख मंडळींनी एकत्रित येऊन यापुढे गावातील कोणत्याही कुटुंबातील व्यक्ती दुर्दैवाने मयत झाल्यास दहाव्या दिवशीच्या विधीचा किंवा सुतकाचा कालावधी कमी करून पाच दिवसांचा करण्याचे ठरले आहे.