सोलापूर : मकर संक्रांतीनिमित्त सोमवारी पहाटेपासून सुवासिनी महिलांची वाणवसा घेण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गर्दी झाली होती. त्यामुळे मंदिर परिसर महिला भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे दिसून आले. यामध्ये सौभाग्याचे लेणं समजला जाणारा लाखेचा चुडा भरण्यासाठीही महिलांची गर्दी झाली होती. मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिरातील रुक्मिणीमाता, महालक्ष्मी मंदिरात सुवासिनी महिलांची वाणवसा घेण्यासाठी भल्या पहाटेपासून गर्दी झाली होती. यावेळी महिला हळदी-कुंकू, बोरं, उसाच्या लहान कांड्या, ढाळा, तिळगूळ, संक्रांतीचे सुगड घेऊन वाणवसा करून परंपरेप्रमाणे एकमेकींच्या डोक्यावर तीळ टाकून, हातावर तिळगूळ देऊन सणाचा आनंद लुटत होत्या. तसेच शहरातील सुवासिनी महिला दिंडीर वनातील लखुबाई, एकविरामाता, हरिदासाची देवी, अंबाबाई, पद्मावती, यमाईतुकाई, आदी मंदिरांमधून वाणवसा करीत असल्याचे दिसत होते. याबरोबरच उपनगरातील महिला त्या त्या भागातील मंदिरामधून एकमेकींना हळदी-कुंकू लावून संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करीत होत्या.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासह चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग आणि स्टेशन रोडवरही महिलांच्या वाणवसा घेण्यासाठी अगदी झुंडी येताना दिसत होत्या. विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडपर्यंत दर्शन रांग पोहोचलेली दिसत होती. संक्रांत सणानिमित्त विठ्ठल मंदिरात वेगवेगळ्या फळा, फुलांबरोबरच सुवासिनी महिलांकडून केल्या जाणाऱ्या वाणवश्यामध्ये समावेश असलेल्या भाजीपाल्यांची आकर्षक सजावट केल्याचे दिसत होते. यामध्ये ज्वारीचे कणीस, हरभऱ्याचा ढाळा, दाणेदार ज्वारीचा हुरडा, ऊस, गाजर, बोरं, शिमला मिरची, आदींचा समावेश होता.