सोलापूर: शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत साेडलेले पाणी अखेर औज बंधाऱ्यात पाेहाेचले. औज बंधारा शुक्रवारी सकाळपर्यंत भरून घेण्यात येईल. बंधारा भरल्यानंतर शहराची दाेन महिन्याची पाण्याची चिंता दूर हाेईल, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्यंकटेश चाैबे यांनी सांगितले. साेलापूर शहराला उजनी ते साेलापूर जलवाहिनी, औज बंधारा, हिप्परगा तलावातून पाणी पुरवठा हाेताे. औज बंधारा १५ दिवसांपूर्वी काेरडा पडला.
त्यामुळे उजनी धरणातून पाणी साेडण्यात आले. १२ मार्च राेजी साेडलेले पाणी दहा दिवसानंतर औज बंधाऱ्यात आले. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता बंधारा २५ टक्के भरला हाेता. बंधारा भरल्यानंतर पाणी टाकळी इनटेक वेलमध्ये घेण्यात येईल. औज बंधाऱ्यातील पाणी मे महिन्यापर्यंत पुरेल असा अंदाज आहे. जून महिन्यात पुन्हा उजनी धरणातून पाणी घेण्यात येईल. तूर्तास दाेन महिने शहराला पाणी पुरवठ्याची चिंता नाही, असेही चाैबे यांनी सांगितले.