लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करत असताना डिसेंबरपर्यंत कोणत्याही नेत्यांना गावबंदी करू नका, अशा सूचना मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे-पाटील यांनी दिल्या आहेत. यामुळे आम्ही विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी येणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना विरोध करणार नाही, अशा घोषणा मराठा समाजातील काहींनी दिल्या, तर उपमुख्यमंत्र्यांना आम्ही पूजेला येऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामीण भागातील मराठा नेत्यांनी घेतली. त्यामुळे पंचायत समितीसमोर सोमवारी दोन्ही गटांत शाब्दिक वाद झाला.
पंढरपूर तहसील कार्यालय परिसरात मागील ७२ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. याठिकाणी शहर व ग्रामीण भागातील मराठा समाजबांधवांची बैठक सुरू होती. काही नेते म्हणाले, शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ द्या, तर काही नेते नको म्हणाले. अशातच शहर व ग्रामीण वाद सुरू झाला.
उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करणारकार्तिकी एकादशीचा सोहळा २३ नोव्हेंबरला होणार आहे. परंपरेनुसार शासकीय महापूजा ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीला विरोध दर्शविला, तर माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी पत्रपरिषदेतून उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार असल्याचे सांगितले.