सोलापूर : उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम थांबविल्याप्रकरणी सोलापूर स्मार्ट सिटीच्या तत्कालीन सीईओंना अधिकार कक्षेनुसार नगरपरिषद संचालनालय नोटीस बजावणार आहे, असे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या सीईओ तथा महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी स्पष्ट केले.
सोलापूर शहराची जीवनदायीनी मानल्या जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी अशा उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम अचानकपणे २४ नोव्हेंबर २०२२ रोजी तत्कालीन सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनचे तत्कालीन सीईओ त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी थांबविण्याचे आदेश संबंधित मक्तेदाराला दिले होते. यामुळे हे काम रखडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाच्या परवानगीशिवाय तसेच स्वतःच्या अधिकार कक्षेत तत्कालीन सीईओ त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी या जलवाहिनीचे काम थांबविण्याचे आदेश दिले. याप्रकरणी त्यांना नोटीस बजाविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच स्मार्ट सिटीच्या बोर्डामध्ये यासंदर्भात विषय घेऊन तत्काळ मक्ता दिलेल्या नव्या मक्तेदाराकडून काम करून घेण्याचेही आदेश प्रशासनाला दिले. येणाऱ्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार समांतर जलवाहिनीचे काम सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यानंतरच आवश्यक ती कार्यवाही होईल, असेही सीईओ शीतल तेली उगले यांनी सांगितले.