अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजयवाडी येथील सूरज रामचंद्र ताम्हाणे (वय ४८) यांच्या घरी १६ मे रोजी रात्री ११ ते १७ मे रोजी पहाटे २.४५ वा.च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या किचनचे बॉक्स ग्रील व खिडकीचे ग्रील कट करून किचनमधून घरात प्रवेश केला. दरम्यान, त्यांची आई प्रमिला यांना चाकूचा धाक दाखवून घरातील लाकडी कपाट उचकटून त्यातील दोन पिशव्यात ठेवलेले सुमारे ३५ लाख ९७ हजार १६१ रुपये किमतीचे ७७.०५५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत सूरज ताम्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गु.र.नं. २६८/ २०२१ भा.दं.वि. ४५८,३८०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना शोधण्यासाठी दोन पथके
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु, अकलूजचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सोलापूरचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी भेट दिली. ठसेतज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांंची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.