ग्रामीण भागातील शेतकरी, नोकरदार, सर्वसामान्य नागरिक कामानिमित्त सांगोल्यातील शासकीय कार्यालय, किराणा, कापड, ज्वेलरी दुकान, आदी ठिकाणी कामानिमित्त येऊन तेथे दुचाकी उभी केली अन् तो काम आटोपून परत येईपर्यंत दुचाकी तेथे राहीलच, याचा भरवसा राहिला नाही. दुचाकी चोर वर्दळीच्या ठिकाणी किंवा दुकाने, शासकीय कार्यालय परिसरात दुचाकीला लक्ष्य करून क्षणात हँडल लॉक तोडून दुचाकी चोरून पसार होतात. रात्री-अपरात्री बंगला असो वा घरासमोर लावलेली दुचाकी चोरटे हातोहात लांबवितात. त्यामुळे दुचाकीमालक अक्षरशः वैतागले आहेत.
दुचाकी चोरीला गेल्यानंतर नागरिक पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जातात. त्यावेळी ठाणे अंमलदार दुचाकी कधी चोरीला गेली, हँडलाॅक केला होता का? शोध घेतला का? एक-दोन दिवस शोध घ्या, मिळून नाही आली तर ओरिजनल कागदपत्रे घेऊन तक्रार देण्यासाठी परत पोलीस स्टेशनला या, असा प्रश्नांचा भडिमार करतात. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना पोलिसात तक्रार द्यावी की नाही, असा प्रश्न पडतो. तक्रार दिल्यानंतर दुचाकी चोरीचा तपास होईल हे सांगणेही अवघड आहे. सांगोला शहर व तालुक्यात गेल्या वर्षभरात शेकडो दुचाकी चोरीला गेल्या. मात्र, सांगोला पोलिसांना अद्यापही दुचाकी चोरीच्या टोळीचा तपास लावण्यात यश आले नाही.
कोट :::::::::::::::::
सांगोला शहर व ग्रामीण भागात वाढत्या दुचाकी चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची दोन पथके दिवस-रात्र गस्त घालणार आहेत. त्यादृष्टीने शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून त्याचीही मदत घेतली जाणार आहे. मध्यंतरी एक दुचाकी चोर पकडला. परंतु, त्यांच्याकडून एकच दुचाकी मिळाली. शहरात चारचाकी वाहनातील सेन्सॉर चोरीप्रकरणी चौघांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे. लवकरच दुचाकी चोरांचा छडा लावला जाईल.
- सुहास जगताप
पोलीस निरीक्षक, सांगोला