बार्शी : शहरातील विविध भागातील नऊ दुकानांचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील साहित्यासह दोन लाख ४६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. शनिवारी (दि. २८) पहाटे ही घटना घडली. याबाबत आज सर्वांच्या वतीने गणेश भीमराव कानडे (वय ३९, रा. सौंदरे, ता. बार्शी) यांनी फिर्याद देताच अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. या घटनेने व्यापारी धास्तावले असून, गस्त वाढवण्याची मागणी होऊ लागली आहे.
सध्या कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. २७ ऑगस्ट रोजी त्यांनी दिवसभर केलेल्या रोख रक्कम टेबलच्या काउंटरमध्ये ठेवून गेले होते. परंतु चोरट्यानी संधी साधून शुक्रवारी रात्रीच्या वेळी शहरातील दुकानाचे शटर्सचे कुलूप तोडून रोकडसह साहित्य पळवले.
त्यात फिर्यादीचे रेडिमेड गारमेंटचे होलसेल दुकानाचे शटर्स तोडून आतील २० हजार रुपये रोख व ४७ हजांराचे १०० जीन्स पॅन्टची पाकिटे, अजित आपटे यांच्या चाटे गल्लीतील आपटे मेडिकल स्टोअर्स दुकानातील तीन हजार, प्रवीण राठोड पांडे चौक, आनाराम चौधरी, महावीर मार्ग येथील पिकोक लाइफ स्टाइल दुकानातून ४० हजार, रणजित अंधारे यांच्या रोहित एजन्सीतून ७० हजार रुपये, आनाराम चौधरी यांच्या कापड दुकानातू १६ लेडीज ड्रेस व रोख ३९ हजार रुपये, गौस रफिक तांबोळी यांचे चार हजार रुपये, तर संदीप बगले यांच्या लातूर रोडवरील मेडिकल स्टोअर्समधून १८ हजार रुपये असा ऐवज चोरट्यांनी पळवला.
----
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह पथकाने पहाणी करून तपासाची कारवाई सुरू केली. पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर उदार तपास करीत आहेत, तर सोलापूरच्या ठसे तज्ज्ञ पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गवळे, हवालदार जयवंत सादुल, पोलीस एकनाथ छत्रे, हवालदार सुरवसे यांनी भेटी दिली. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करताना आरोपींनी मास्क व हातात मोजे घातलेले दिसून आले तर सोलापूरच्या श्वान पथकास पाचारण केले; परंतु ते जवळपासच घुटमळले.