शिवानंद फुलारी ।
अक्कलकोट : ऊस उत्पादक शेतकºयांनो सावधान! काही ऊस वाहतूक चालक रात्रीच्या वेळी रसपानगृहधारकांना चोरून ऊस विक्री करीत आहेत. रविवारी रात्री साडेनऊ वाजता अक्कलकोट-सोलापूर रस्त्यावर डॉ.बंदीछोडे हॉस्पिटलजवळ हा प्रकार उघडकीस आला.गेल्या दोन महिन्यांपासून साखर कारखान्यांचे गाळप चालू आहे.
प्रत्येक तालुक्यात विविध कारखान्यांसाठी ऊसतोडणी जोमाने चालू आहे. अक्कलकोट तालुक्यातून रोज शंभरावर गाड्या विविध कारखान्यांना गाळपासाठी जातात. दिवसभर ऊस तोडून रात्री सर्व गाड्या आपापल्या कारखान्याकडे ऊस घेऊन जातात. अशाच प्रकारे बोरी उमरगे येथून पाटील नावाच्या शेतकºयाच्या शेतातून एम एच-१३-ए जी-५२२८ हा ट्रॅक्टर दोन ट्रॉली जोडून जयहिंद कारखान्याकडे गाळपासाठी निघाला होता. दरम्यान, अक्कलकोट-सोलापूर रस्त्यावरील डॉ.बंदीछोडे दवाखान्याजवळ अंधारात ट्रॅक्टरचालकाने रस्त्याच्या कडेला वाहन थांबवले होते.
सुमारे क्विंटलभर ऊस खाली उतरविल्यावर एका पंचवीस वर्षीय तरूणाने एका मुलीची मदत घेऊन वाहनातून ऊस घेऊन गेला. हा सर्व प्रकार सांगवी बु़ येथील मल्लिकार्जुन घोडके या युवकाने प्रत्यक्ष पाहिला. एवढा ऊस कुठे घेऊन चाललात, असे विचारले असता मी रोज एका ट्रॅक्टरचालकाकडून खरेदीने ऊस घेऊन जात असतो, असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने संबंधिताची छायाचित्रेही आपल्या मोबाईलवरून घेतली. मागच्या आठवड्यात किणी, घोळसगाव येथील दोन शेतकºयांनी आपल्या शेतातील ऊस गाडीत भरून कारखान्याकडे पाठविल्यावर फारच कमी ऊस भरले होते. यामागे अशाच प्रकारच्या घटना तर नसाव्यात, अशी शंका आता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
एका गाडीमागे दोन क्विंटल- सध्या अक्कलकोट शहर व परिसरात दहा ते पंधरा रसपानगृह आहेत. यापैकी बहुतेक जण अशाच प्रकारे चोरीने ऊस खरेदी करून रसपानगृह चालवितात, असा संशय व्यक्त होत आहे. एका ऊस गाडीमागे किमान एक ते दोन क्विंटल ऊस अशाच प्रकारे विकला जातोे. या माध्यमातून रोज हजारो रुपये ट्रॅक्टरचालक लुटत आहेत. यामुळे शेतकºयांच्या मालाच्या चोरीचा हा नवा प्रकार सर्वांनाच अचंबित करणारा आहे.
मी बोरी उमरगे येथील पाटील नावाच्या शेतातून ऊस घेऊन जयहिंद साखर कारखान्याला घेऊन जात आहे. मला कबूल केल्याप्रमाणे दर खेपेला दोनशे रुपये दिले नाही म्हणून मी ऊस विकला आहे.- ट्रॅक्टरचालक, एमएच-१३-एजे-५२२८
मी रात्रीच्या वेळी सदर ठिकाणी थांबलो होतो. हा प्रकार बघून संबंधित ट्रॅक्टर चालकास हटकले तरीही त्याने जुमानले नाही. ते ऊस एक मुलगा, एक मुलगी घेऊन गेले. संबंधित ट्रॅक्टरचालकाची छायाचित्रे मी माझ्या मोबाईलमधून घेतली आहेत.- मल्लिकार्जुन घोडके, युवक, सांगवी बु.