आप्पासाहेब पाटील, सोलापूर : काही वर्षापासून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या, माझी कन्या भाग्यश्री अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. शिवाय प्रसुतीपूर्व लिंगनिदान बंदी कायदा कडक केल्याने मुलींच्या जन्मदरात वाढ होत असल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात असले तरी जिल्ह्यात एक हजार पुरूषांमागे ९४५ महिला असल्याची माहिती समोर आली आहे.
बार्शी, वैराग, कुर्डूवाडी, टेंभूर्णी, माळशिरस व अकलूज या भागांत मुली जन्माचे प्रमाण कमी आहे. शहरात महानगरपालिकेच्या हद्दीत स्त्री-पुरुष गुणोत्तर २०२२ मध्ये ९७८ इतके झाले आहे. शिक्षण, डिजीटल युग जनजागृतीमुळे आई-वडिलांच्या मानसिकतेत बदल होत आहेत. नाेकरी, व्यवसाय करण्यासाठी ते मुलींना पाठबळ देत आहेत. आज डिजिटलच्या युगात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग अशा सर्वच् क्षेत्रात मुली-मुलांच्या खांद्याला खादा लावून काम करीत आहेत. शासन, प्रशासन यांनी अशीच जनजागृती चालू ठेवली तर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाणही निश्चितच वाढेल असे सांगितले जाते. दरम्यान, मुली जन्माच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद नुकतेच एका बैठकीत सांगितले.