सोलापूर : वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या वेगवान प्रयत्नांना यश येत आहे. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी महावितरणने विजेचे भारनियमन केले नाही. सुरळीत वीजपुरवठ्याची ही स्थिती गेल्या सहा दिवसांपासून कायम आहे. तसेच कृषिपंपांना दिवसा व रात्री चक्राकार पद्धतीने सलग ८ तास वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे व तो कायम ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू असल्याची माहिती महावितरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे. परंतु महावितरणकडून करण्यात आलेल्या वेगवान प्रयत्नांमुळे अतिरिक्त स्वरूपात वीज उपलब्ध झाली आहे. वीजपुरवठ्याच्या स्थितीत बऱ्यापैकी सुधारणा हाेत आहे. महावितरणच्या या प्रयत्नांमुळे दोन तास कृषिपंपाचा कमी केलेला वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यात आला आहे. आता चक्राकार पद्धतीने दिवसा ८ तास व रात्री ८ तास वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. हा वीजपुरवठा असाच सुरू राहील यासाठी महावितरण पूर्ण प्रयत्न करीत आहे.
----------
पाच दिवसात कुठेही भारनियमन नाही
वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या वेगवान व अथक प्रयत्नांना यश आले असून मागील पाच दिवसात राज्यातील कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही. सर्वच वर्गवारीतील फिडरवर महावितरणने अखंडित वीजपुरवठा करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
वीज बचतीसाठी सोशल मीडियाचा आधार
वीज बचतीसाठी महावितरणने आता प्रसार, प्रचार व जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी हे सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर वीज बचतीचे संदेश सकाळ, दुपार अन् संध्याकाळी पोस्ट करून वीज ग्राहकांना विजेबाबतचे महत्त्व पटवून देत आहेत.