प्रांताधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मंगळवारी सीना आणि भीमा नदीच्या पूरस्थितीची पाहणी केली. सीना नदीकाठच्या वडकबाळ, औराद, कुडल, वांगी, आदी गावांना त्यांनी भेटी दिल्या. वांगी येथील शेतकरी आणि ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली. नदीकाठी जाऊन पूरस्थितीची माहिती घेतली. त्यांच्यासमवेत मंद्रुप तहसीलच्या अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे, मंडळ अधिकारी संतोष फुलारी, तलाठी बिदरकोटे, मंद्रुपचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे आदी उपस्थित होते. वांगीचे सरपंच श्यामराव हांडे यांनी पुराने जनजीवन विस्कळीत झाल्याचे सांगत, शेतीचे नुकसान झाल्याची माहिती दिली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------
काढणीच्या पिकांत पाणी
सलग दोन दिवस कमी जास्त पाऊस झाल्याने, राजूर, होनमुर्गी, संजवाड, बिरनाळ, वडकबाळ, वांगी परिसरातील पिकात पाणी साठले आहे. काढणीला आलेली उडीद, मूग ही पिके पाण्यामुळे नुकसानीत गेली आहेत. कांद्यात पाणी साठल्यामुळे करपा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. आता ही पिके हातची जाणार हे स्पष्ट आहे.
-----
जीवित अथवा पिकांची हानी नाही
उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात येत आहे. धरण क्षेत्रात मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान खात्याने कळवले आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. पुराने जीवितहानी अथवा पिकांचे नुकसान झाले नाही. प्रशासन सर्व बाबींकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. पिकांचे नुकसान झाल्यास योग्य ती कारवाई होईलच, असे आश्वासन प्रांताधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिले.
-----