पंढरपूर : नगरपालिका वाॅर्ड रचनेच्या आराखड्यात हस्तक्षेप केला जात असल्याचे विरोधकांचे आरोप हे बिनबुडाचे असल्याचे नगराध्यक्षा साधना भोसले यांनी स्पष्ट केले.
विरोधकांकडून सध्या सुरू असलेल्या आरोपांबाबत पालिकेच्या नगराध्यक्षा म्हणून स्पष्टीकरण देण्यासाठी येथील पालिकेच्या सभागृहात मंगळवारी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले म्हणाल्या, शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांचे वाॅर्ड रचनेबाबतचे काही आदेश आले आहेत. येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीसाठी मुख्याधिकाऱ्यांना वाॅर्ड रचनेचा आराखडा तयार करण्याच्या सूचना आलेल्या आहेत. त्यामध्ये शासनाने स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, वाॅर्ड रचनेचा आराखडा तयार करताना कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांचा किंवा पुढाऱ्यांचा हस्तक्षेप होणार नाही. याची दक्षता घ्यावी. त्या आदेशानुसारच वाॅर्ड रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम होणार आहे.
मात्र, काही राजकीय पुढाऱ्यांनी वाॅर्ड रचना करताना काही तरी गफलत केली जात असल्याची सध्या चिखलफेक सुरू केलेली आहे. तशी कोणतीही गफलत यामध्ये होणार नाही. याची दक्षता मुख्याधिकारी घेणारच आहेत. जिल्हाधिकारी स्वत: यामध्ये लक्ष घालणार आहेतच. शासनाच्या नियमानुसारच येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेऐवजी वाॅर्ड रचना होणार आहे. हा आराखडा तयार करीत असताना शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. यावेळी उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, पालिकेतील भाजपचे गटनेते अनिल अभंगराव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, सुप्रिया डांगे आदी उपस्थित होते.
--------------
बेघरांना घरे उभारणीची कामे सुरु
शहरात तसेच उपनगरात बऱ्याच ठिकाणी अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लागत आहेत. अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी पालिकेच्या जागेवर मोठे नामसंकीर्तन सभागृह साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बेघरांना घरे उभारण्याचे काम सुरू आहे.
-----