सोलापूर : तुम्ही ग्रामपंचायत बिनविरोध करा, अन् विकासासाठी लाखो रुपये मिळवा, या आमदार यशवंत माने यांच्या घोषणेला उत्तर सोलापूर तालुक्यात प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कारण काही गावांत बिनविरोधच्या चर्चा सुरू असल्यातरी हेवेदावे बाजूला ठेवून एक सूर होताना दिसत नाही.
उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यास बुधवारपासून सुरुवात होत आहे. या २४ ग्रामपंचायतींपैकी आमदार यशवंत माने प्रतिनिधित्व करीत असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील १७, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघातील दोन व आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील पाच ग्रामपंचायती आहेत.
भागाईवाडी, साखरेवाडी, वांगी, वडाळा, पडसाळी व बीबीदारफळ या गावांत काहींनी बिनविरोध करण्याचा सूर लावला आहे, मात्र त्याला समोरून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. बीबीबीदारफळ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास तलाठी सोमनाथ गवळी यांनी एक लाख, तर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शैलेश साठे यांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. परंतु राजकीय मंडळींचे सूर जमताना दिसत नाहीत. आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील हिरज ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा गावातूनच प्रयत्न सुरू आहे.
कोट
तालुक्यातील चार-पाच गावांत निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठीचे प्रस्ताव आहेत. मात्र जागा वाटपात अवास्तव मागणी असल्याने एकोपा होत नाही. तरीही काही ठिकाणी चर्चा सुरू आहेत.
- बळीरामकाका साठे
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस