सोलापूर : श्रमिक वस्त्यांमधील हजारो विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. शाळेतील शिक्षकांनाही आॅनलाईन अभ्यासक्रम शिकवताना अडचणी येत आहेत. त्यामुळे पूर्व भागातील आशा मराठी विद्यालयातील शिक्षकांनी शाळेचा अभ्यासक्रम गरीब विद्यार्थ्यांच्या घरांच्या भिंतीवर रंगवला. तीनशे घरांच्या भिंतींवर शालेय अभ्यासक्रम साकारला जाणार असून सध्या १८० घरांच्या भिंती रंगविल्या आहेतकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. सरकारने आॅनलाईन शाळा भरवायला सांगितलं आहे. विद्यार्थी घरीच बसून आपल्या घराच्या भिंतीवरील अक्षर ओळख, गणितीय सूत्र, तसेच मराठी-इंग्रजी व्याकरण यांसह इतर शालेय अभ्यासक्रम पाठ करताहेत. या अभिनव उपक्रमाचा इतर शाळेतील विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होतोय.
नीलमनगर येथील आशा मराठी विद्यालयाकडून घरांच्या भिंतींवर शालेय अभ्यासक्रम रंगीबेरंगी पेंट्सद्वारे रंगविले जात आहे. आकर्षक चित्रकृती, अक्षर, गणितीय आकडेमोड, भौगोलिय घडामोडी। विज्ञानातील प्रयोग, महापुरुषांची नावे, सामान्यज्ञान, गणिती कोडे,शब्दकोडे, स्वच्छतेचे संदेश, चांगल्या सवयी तसेच समाजाभिमुख घडामोडींच्या चित्रकृती तसेच चित्रकृती यांसह यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. विद्यार्थी आवडीने त्यांना वेळ मिळेल तेव्हा भिंतींवरील अक्षरे वाचताहेत. जोरात पाठांतरही करताहेत.
भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हारुन पठाण तसेच शाळेतील शिक्षक राम गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम सुरू झाला आहे. याकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका तसलीमबानो पठाण तसेच आफ्रिन सय्यद यांचेही मोलाचे सहकार्य आहे. याकरिता दोन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. याकरिता शाळेतील शिक्षक तसेच शाळेतील आजी-माजी विद्यार्थी मदत करत आहेत, अशी माहिती शिक्षक राम गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिली.
नीलमनगर परिसरातील बहुतांश विद्यार्थी गरीब आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. त्यामुळे असे गरीब विद्यार्थी अभ्यासक्रमापासून वंचित राहू नयेत, याकरिता आम्ही अभ्यासक्रम त्यांच्या दारापर्यंत नेला आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसतोय. विशेष म्हणजे विद्यार्थी मोठ्या कुतूहलातून अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. पालक समाधानी आहेत. -तसलीमबानो पठाण, मुख्याध्यापिका- आशा मराठी विद्यालय.