काव काव ये म्हणत पितृपक्षाचे या महिण्यात लोकं कावळ्याला बोलावत असतात.कावळा येईल व आपण बनविलेल्या पिंडाला शिवून जाईल.मग कावळ्यानं पिंडाला शिवलं की आपल्या पितरांना मोक्ष मिळेल व आपले पितर आशीर्वाद देतील ही त्या मागील भावना.
आता पिंड बनवितात.तेही पीठाचं.जे कावळ्याचं खाद्य असतं.तसेच ते खाद्य कावळ्यांना आवडतं.या पृथ्वीवर या देशात रुजलेल्या संस्कृतीनुसार कावळ्याला यमाचा दूत समजण्यात येवून तर्पण केलं जात.लोकांना वाटतं की आमचा संदेश हा कावळ्याच्या माध्यमातून आमच्या पितरांपर्यंत जातो.आत्मा असतो.तो दिसत नसला तरी शाश्वत आहे.अमर आहे. जर या मेलेल्या माणसांचं तर्पण केलं नाही किंवा पितृपक्षात त्याचं श्राद्ध जर केलं नाही तर आमचे जे काल नातेवाईक होते.ते रुष्ट होतील व कोपतील.त्यातून शापवाणी निघेल व ती शापवाणी आपल्याला परीवारासह नेस्तनाबूत करुन टाकेल.म्हणून हे तर्पण किंवा श्राद्ध.हे श्राद्ध काव काव ये म्हणत केलं जातं.मग आपले पित्तर काय काय खात होते.तेही त्या पात्रात ठेवलं जात.तो जर पितर दारु पित असेल तर दारु.मांस खात असेल तर मांस.मासे खात असेल तर मासे आणि तंबाखू,विडी ओढत असेल तर तेही पात्रावर ठेवलं जात.कावळ्यांच्या पिंडाला किंवा पात्राला शिवण्यावरुन पाप पुण्याचा हिशोब लावला जातो.
पुर्वी भरपूर कावळे असायचे.दिसायचेही.त्याचबरोबर पिंडाला शिवायचेही.जर ते शिवत नसतील ज्याच्या पात्राला किंवा पिंडाला.तर त्या माणसाला पापी समजण्यात येत असे.पण अलिकडे कावळा महाग झालाय.डोळ्यालाच दिसत नाही.कारण ज्या लोकांनी कावळ्याला यमाचं दूत समजलं,त्याच लोकांनी कावळ्याला नष्ट करुन टाकलं.कधी शेतात पिकांवर पिकांवरील किडी मारण्यासाठी विषप्रयोग करुन.तर कधी कावळ्याला खाद्यपदार्थ समजून.तर कधी मोबाईल सारखे नवनवीन शोध लावून(इंटरनेटचे जाळे पसरवून) त्यात कावळे मरण पावले.आपणच मारले कावळे जाणूनबुजून. मग कावळा महाग होणार नाही तर काय? त्यातूनच कावळा महाग झाला.आता कावकाव ये जरी म्हटलं तरी कावळा यायला पाहात नाही.कारण माणसांचा इथं मुळात स्वभावच बदलला.आता कावळ्यालाही समजायला लागलं आहे की माणूस मतलबी आहे.पिंडाला शिवण्याच्या बहाण्यानं बोलावेल आणि मला पकडून मारुन खावून टाकेल.तशी जीवाची भीती कोणाला नाही.तो मग कावळा का असेना.....त्यालाही आहेच.
विशेष सांगायचं म्हणजे आम्हाला तर्पण करण्याचा किंवा श्राद्ध करण्याचा काहीच अधिकार नाही.असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.याचं कारणही तसंच आहे.तसा प्रश्न प्रत्येकानं आपल्या मनाला विचारल्यास त्याचं उत्तर मिळेल.आज आमची मुलं लहानाची मोठी होतात. खुप खुप शिकतात.नोकरी पकडतात.विदेशात नोकरी करायला जातात.कोणी देशातही नोकरी करतात.मग त्याचा विवाह होतो.कधी कधी हे विवाह मायबापाच्या मजीर्नं होतात.कधी मायबापाची मर्जी चालत नाही.त्यांचे प्रेमविवाह होतात.अशी मुले नोकरी निमित्यानं लहानाची मोठी झाल्यावर व पंख फुटल्यावर मी माझी पत्नी व माझी मुले म्हणत वेगळी राहात असतात.वेगळी चूलही मांडतात.त्यांना मायबापाचा विसर पडतो.मग मायबापानं लहानाचं मोठं करतांना काय काय केलं त्यांच्यासाठी.त्याचाही विसर पडतो त्यांना.यातूनच मायबापांना म्हातारपण येतं.
मायबाप म्हातारे झाले की त्यांना सेवेची खरी गरज असते.त्यांना वाटते माज्या मुलानं माझी सेवा करावी.नातवंडं माज्या अंगाखाद्यावर खेळावीत.सुनेनं कपभर चहा द्यावा नव्हे तर दुखत असलेले पाय दाबून द्यावेत.पण सगळं उलटं होतं.नातवंडं या म्हाता-या आजीआजोबांशी हेकड बोलतात.बापाला नोकरी निमित्यानं मायबापाकडं लक्ष द्यायला वेळच नसतो.तसेच सुनंही पाय दाबून देण्याऐवजी गळा दाबायला धावते.काही काही मुलं अन् सुना तर कितीही म्हाता-यांची संपत्ती असली तरी त्या फक्त संपत्तीचा वापर करतात.सेवा दूरच.त्यांची फुकटची कटकट नको म्हणून त्यांना वृद्धावस्थेत वृद्धाश्रमात टाकतात.काही मुलं आपल्या मायबापाला घरी जरी ठेवत असली तरी त्यांचं हाल हाल करतात.ते एवढे हाल हाल करतात की यापेक्षा मरण बरं असं म्हाता-यांना वाटायला लागतं.अशातच एक दिवस ते मरण पावतात.मग काय,ते मरण पावले की तर्पण आणि दरवर्षी श्राद्ध.कारण आपली श्रद्धा आहे की माणूस मेल्यावर त्याच्या श्राद्धाचा कार्यक्रम केल्यास ते आपले पुर्वज पावतात आशीर्वाद देतात.पण जे अशी जीवंतपणी आपल्या मायबापांना त्रास देत असतील.त्यांचे हालहाल करीत असतील.तर त्या हाल करणा-यांचे पितर खरंच आपली जरी श्रद्धा असली तरी श्राद्ध केल्यावर पावत असतील का? समजा अशा मायबापाच्या पिंडाला कावळा जरी शिवला तरी ते पितर आशीर्वाद देत असतील का? ही विचार करायला लावणारी बाब आहे.
पुर्वी अशी पद्धत नव्हती. संयुक्त कुटूंबपद्धती होती.लोकं एकाच गावात एकत्र कुटूंबात राहायचे. त्यातच काही लोकं म्हातारीही असायची.त्यांचीही सेवा व्हायची.त्यातच ते मरण पावले तर श्राद्ध ही व्हायचं.कावळे यायचे. पिंडाला शिवायचे.मग त्या पित्तरांचा आशीर्वाद लागो की न लागो.आत्मीक समाधान नक्कीच लाभायचं.भीतीही नष्ट व्हायची. पण आता तसं नाही. आत्मीक समाधान उरलेले नाही.लोकं श्राद्ध करतात भीती आहे म्हणून.मी माज्या पित्तरांची सेवा केलेली नाही. हे ते या जगातून निघून जाताच कळायला लागतं.जेव्हा ते जीवंत असतात.तेव्हा मात्र सेवा तर सोडा.साधं चांगलं बोलणंही आपण आपल्या मायबापासोबत करीत नाही आणि मेल्यावर श्राद्ध करीत असतो.आत्मीक समाधानासाठी.मग कावळा शिवला की बरे वाटते.आत्मीक समाधान वाटते.आपल्या पित्तरानं कावळ्याच्या रुपानं येवून आशीर्वाद दिला असं वाटतं.पण खरंच आपल्या मायबापाची जीवंतपणी सेवा न करणा-यांना मेल्यावर त्याच्या पित्तरांच्या पिंडाला कितीही कावळे शिवत असले तरी त्यांचा आशीर्वाद मिळू शकत असेस काय?तर याचे उत्तर नाही असेच असेल.मग कितीही कावळे येवू द्या.कितीही कावळे शिवू द्या पिंडाला.झोळी मात्र रितीची रितीच असते.
हे झालं मायबापाच्या बाबतीत.कावळ्याच्याही बाबतीत तेच आहे.कावळा श्राद्धाच्या दिवशी दिसला की आपल्यासाठी देव ठरतो आणि इतर दिवशी दिसला की आपल्यासाठी तो शैतानच वाटतो.एखाद्या दिवशी एखादा वाळत घातलेला पापड त्या कावळ्यानं नेल्यास 'होळ्या होळ्या' म्हणत आपण त्याला दगडं मारतो.एखादा दगड लागतोही त्यांना.त्यातच ते घायाळ होतात.मग कुठं जाते आपले त्यांना देव मानणे.ही देखील विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
महत्वाचं म्हणजे श्राद्ध करण्याची गरज नाही. पित्तर असेच पावतील व तुम्हाला भरभरुन आशीर्वाद देतील. मग त्यांच्या पिंडाला कावळा शिवला नाही तरी.......त्यासाठी मायबापाची त्यांच्या जीवंतपणीच चांगली सेवा करा.त्यांचे पाय दाबून द्या.त्यांना वृद्धावस्थेत वृद्धाश्रमात पाठवू नका.त्यांना प्रेम द्या.नातवंडं काही अपशब्द बोलत असतील,तर नातवंडांना तसं बोलायला मनाई करा. समजून सांगा. असे जर तुम्ही केले तर, कधी श्राद्ध नाहीही केलं.पात्र नाहीही पुजलं. तरी तुमचं वाईट होणार नाही. तसेच पिंडाला शिवण्यासाठी कावळ्याला काव काव ये म्हणून बोलविण्याची गरज उरणार नाही.
- अंकुश शिंगाडे