सोलापूर : गेले तीन दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने शुक्रवारी सकाळी उघडीप दिल्याचे दिसताच हद्दवाढ भागातील नागरिकांनी दसरा धुवायला काढला अन् अचानक नळाचे पाणी गेले. त्यामुळे सकाळीच पाण्यासाठी घराघरात धावपळ उडाली आहे.
गेले तीन दिवस सोलापुरात पावसाची संततधार होती दसरा सणाच्या तोंडावर सूर्यदर्शन न झाल्याने नागरिकांना घरातील कपडे धुण्याची अडचण झाली होती. शुक्रवारी सकाळी पावसाने उघडीप दिल्याचे दिसताच सर्वांनी दसरा धरायला काढला. घराघरातून ही लगबग सुरू असतानाच अचानक नळाचे पाणी गेले, त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा फोन खणखणू लागला जुळे सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी पंपग्रहाचा वीजपुरवठा पहाटे साडेपाचपासून खंडित झाला आहे. त्यामुळे पुरेसा पाण्याचा उपसा होऊ न शकल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. वीजपुरवठा पूर्ववत झाल्यावर नागरिकांना पाणी मिळणार आहे.
पावसाने शहरात सगळीकडे मोकळ्या जागेत जलाशय साठली आहेत. अतिवृष्टी झाल्याने शहराजवळच्या सीना व भीमा नद्या दुथडी भरून वाहत आहेत, पण आज दसरा सणाच्या तोंडावर नळाचे पाणी गेल्याने लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.