सोलापूर : स्मार्ट सिटी अंतर्गत सिद्धेश्वर मंदिर परिसर विकसित करण्यात येत असून, परिसरात खुली जिम सुरू करण्यात येत आहे. यासाठी व्यायामाचे साहित्य परिसरात लावण्यात आले आहे. मात्र, या जिमचे उद्घाटन होण्याआधीच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जिमच्या वापरास सुरुवात केली.
सिद्धेश्वर मंदिराभोवती पावणेदोन किलोमीटरचा पादचारी रस्ता स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात येत आहे. मुख्य बाह्यरस्त्यापासून पंधरा ते वीस फूट खाली तलावाकाठी हा रस्ता आहे. त्यामुळे तिथे धुळीचा त्रास न होता शुद्ध हवा मिळते. परिसरात जागोजागी बसण्याची व्यवस्था, दोन्ही बाजूंनी लावण्यात आलेली फुलझाडी त्यासोबत खुल्या जिमची सुविधा करण्यात आली आहे.
कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे थांबलेले काम मागील महिन्यापासून युद्धपातळीवर सुरू आहे. खुल्या जिमच्या साहित्यांची बांधणी करण्यात आली आहे. त्यासोबतच लहान मुलांसाठी सीसॉ, घसरगुंडी, चक्र हे सुद्धा ठेवण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी फिरायला आलेल्या मुलांचे लक्ष या खेळण्याकडे गेले अन् ते त्यामध्ये रमले. त्यांच्यासोबत आलेल्या पालकांनी जिमच्या साहित्यांची चाचपणी करीत सराव सुरू केला. एकेक करीत सर्वच फिरायला येणाऱ्या नागरिकांनी येथे व्यायाम करण्यास सुरुवात केली.
या साहित्यांचा आहे समावेश
दैनंदिन जीवनात सर्वांना उपयोगी पडणाऱ्या सहजसुलभ व्यायामाच्या साहित्यांची मांडणी करण्यात आली आहे. त्यामध्ये मांडीचे आणि पाठीच्या व्यायामासाठी थाईस मशीन, पोटाचे आणि पाठीच्या व्यायामासाठी ट्विस्टर, मांसल भागासाठी क्रॉस ट्रेनर, खांद्याच्या व्यायामासाठी शोल्डर प्रेस मशीन, स्नायूंच्या व्यायामाकरिता ट्रायसेफ मशीन, छाती आणि हृदयासाठी चेस्टबेल्ट बसविण्यात आले असल्याचे जिम ट्रेनर अमर पुला यांनी सांगितले.