अकलूज-माळेवाडीचे नगर परिषदेत व नातेपुतेचे नगरपंचायतीत रूपांतर करावे, या मागणीसाठी तीनही गावांच्या नागरिकांनी २२ जूनपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. या साखळी उपोषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. तीनही गावांच्या ग्रामस्थांसह तालुक्यातील, जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय संघटनांतर्फे पाठिंबा देण्यात येत आहे. तिन्ही गावांचे ग्रामस्थ व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने उपोषणस्थळी उपस्थित राहत आहेत.
आज १८ व्या दिवशी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच मुसळधार पावसाने अकलूज शहरात हजेरी लावली. पडत्या पावसात षुरुष ग्रामस्थांसह महिलाही भिजत येऊन मोठ्या हिरिरीने उपोषणात सहभाग नोंदविला. या वेळी आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, जि.प. सदस्या सुनंदा फुले, अकलूजच्या सरपंच पायल मोरे, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांडगे, अकलूजचे सदस्य किशोर राऊत, नाशिक सोनवणे, रेश्मा गायकवाड, रेश्मा तांबोळी, प्रतिभा गायकवाड, माजी पं.स. सदस्या फातिमा पाटावाला यांच्यासह महिलावर्ग, अरुण राऊत, लालासो आडगळे, विशाल मोरे, आशिष मोरे, सुधीर मोरे, अतुल मोरे, चेतन मोरे, ओंकार काळे, रोहित शेटे, नरेंद्र पाटोळे आदींनी सहभाग घेतला. तर महात्मा फुले गणेश मंडळ, कर्मवीर नवरात्र मंडळाने पाठिंबा दिला.