भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण केळीपैकी तीस टक्के केळी अफगाणिस्तान येथे निर्यात केली जाते. परिणामी आगामी काळात अफगाणिस्तानातील परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर त्याचा फटका केळी निर्यातीवर होण्याची शक्यता आहे, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, पंढरपूर येथील केळी उत्पादकांना त्याचा फटका बसला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अफगाणिस्तानमधील १५ कंटेनर केळीची ऑर्डर होती. परंतु अफगाणिस्तामधील तालिबानी वर्चस्वामुळे सुरू झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे सर्व ऑर्डर्स रद्द झाल्याची माहिती केळी व्यापाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यातील केळीला स्वादिष्ट चव व उत्तम दर्जा असल्याने आखाती देशांसह इतर देशांतून मोठ्या प्रमाणावर सोलापूर जिल्ह्यातील केळीला मागणी आहे. परंतु कोरोना संसर्गजन्य रोगाबरोबर नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत असताना आता अफगाणिस्तानमधील तालिबानी वर्चस्वामुळे केळी निर्यातीत घट झाल्यास त्याचा फटका केळी उत्पादकांना बसणार आहे. त्यामुळे केळी उत्पादकांमधून चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
आधीच कोरोनामुळे केळी उत्पादकांना वाहतूक बंद राहिल्याने प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. त्यानंतरच्या काळात केळीच्या दरात तेजी निर्माण झाली आहे.
---
मोठा आर्थिक फटका
जोपर्यंत तेथील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत निर्यात चालू होण्याची शक्यता कमी आहे. अफगाणिस्तान हा इराणनंतरचा सर्वांत मोठा भारतातून केळी आयात करणारा देश आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात थांबल्याने मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
----
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अफगाणिस्तानमधील १५ कंटेनरची केळीची ऑर्डर होती. परंतु तेथील गोंधळाच्या स्थितीमुळे सर्व ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. आता या केळींची निर्यात न झाल्यास खूप मोठ्या नुकसानीस केळी उत्पादक व व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे.
- सुयोग झोळ, वाशिंबे
----