मोडनिंब : मोडनिंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिली व दुसरी कोरोना प्रतिबंध लस मिळावी, यासाठी ४५ वर्षांपुढील नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. शुक्रवारपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात हजारांपेक्षा जास्त नागरिकांच्या नोंदी झाल्या होत्या, मात्र केवळ ७० लस उपलब्ध झाल्याने रांगेत उभ्या राहिलेल्या नागरिकांची निराशा झाली.
प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नोंद करून टोकन घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. या ठिकाणी अंगणवाडी सेविका, शिक्षक व समाजसेवक हे सर्व जण मिळून या नागरिकांना नंबरचे टोकन देण्यासाठी व नोंदणी करून घेण्यासाठी मदत करीत आहेत.
सध्या मोडनिंबमधील नागरिकांची एक हजारापेक्षा जास्त नोंदणी शुक्रवारपर्यंत झाली होती, मात्र शुक्रवारी मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्रावर केवळ ७० लस उपलब्ध झाल्या. त्यामुळे आपला नंबर कधी याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
------