सोलापूर : पावसाळी वातावरण नसल्यामुळे शहर व जिल्ह्यातील वातावरण काहीसे बदलले असून सोलापूरकरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. येत्या आठवडाभरात अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दिवसाचे कमाल तापमानही सरासरीच्या खाली घसरल्याने दिवसाही हवेत गारवा आहे. कोरड्या हवामानामुळे आणखी पाच दिवसतरी गुलाबी थंडी जाणवेल, असा अंदाज आहे. मागील काही दिवसांपासून थंडी पडल्याने तापमान घटले असून तीन ते चार दिवसांपासून गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहे.
शहर व जिल्ह्यात २० डिसेंबरपर्यंत मध्यम थंडी असणार असून या दरम्यान बोचरी थंडी नसेल तसेच उकाडाही होणार नाही. हे वातावरण सर्वांसाठी अनुकूल असून पिकांसाठीही चांगले असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सकाळी धुके पाहायला मिळत असून व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
-----------
ढग असणार पण, पावसाची शक्यता नाही
या आठवड्यात वातावरण कोरडे असणार असून काहीसे ढगही जमा होतील ; मात्र पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली नाही. या दरम्यान थंडी ही मध्यम स्वरुपाची असणार आहे. सरासरी किमान तापमान हे १८ ते २३ तर, कमाल तापमान हे २९ ते ३२ पर्यंत असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याचे कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय अमृतसागर व कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. विजय जाधव यांनी सांगितले.
-----------
मागील पाच दिवसातील किमान तापमान
- १४ डिसेंबर - १६.६
- १३ डिसेंबर - १७.५
- १२ डिसेंबर - १६.२
- ११ डिसेंबर - १७.२
- १० डिसेंबर - १८.६