सोलापूर : पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्य विभागाकडून मुबलक औषध पुरवठा, पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या दिंड्यांना सामाजिक संस्था, व्यक्ती यांच्याकडून दिंड्यातील वारकरी भाविकांना अन्नदान व फळ वाटप केले जाते. वाटप करण्यात अन्नाची व फळांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
दरम्यान, आरोग्यसेवा पुरविणे, फळे, प्रसाद व अन्नाची तपासणी करण्यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके मागविण्यात येणार आहेत. तसेव पालखी सोहळा प्रस्थानापासून वारकरी भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत राहणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना तात्काळ व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे वाखरी व तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. तसेच गोपाळपूर व ६५ एकर येथे ५० खाटांचे तात्पुरते सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या शिबिरात सुसज्ज आरोग्य यंत्रणेसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करण्यात येणार असून, भाविकांची आरोग्य तपासणी करुन तात्काळ उपचार करण्यात येणार आहेत. आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविक येतात. येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे.