बार्शी : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत राज्य सरकारची आजची भूमिका ही मराठ्यांच्या बाजूने नसल्याचा आरोप करत जोपर्यंत आपण लढत नाही, आक्रोश दाखवत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. त्यासाठी परत एकदा ४ जुलैला मराठा आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माथाडी कामगार नेते, माजी आ. नरेंद्र पाटील यांनी केले.
४ जुलै रोजी निघणाऱ्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आमदार राजेंद्र राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी युवा उद्योजक दादासाहेब गायकवाड यांच्या निवासस्थानी पाटील यांनी भेट दिली.
पाटील म्हणाले, आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे या मागणीसाठी स्व. अण्णासाहेब पाटील यांनी २२ मार्च १९८२ ला आंदोलन केले. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात राज्याच्या विविध भागांतून नागरिक उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी राजकर्त्यांची त्यावेळीही भूमिका नव्हती, म्हणून अण्णासाहेबांनी फार कठोर निर्णय घेऊन २३ मार्च रोजी स्वत:चे बलिदान दिले. त्यानंतर मराठ्यांना न्याय मिळावा यासाठी आमच्या कित्येक संघटना, तालुक्यात आणि जिल्ह्यात कार्यरत राहिल्या.
त्यानंतर कोपर्डी घटनेनंतर मराठा समाज एकवटला आणि ५८ मूक मोर्चे काढले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वारंवार मराठा क्रांती मोर्चाच्या वेगवेगळ्या नेतृत्वाच्या माध्यमातून राज्यकर्त्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालावे, अशी मागणी केली. समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना याच्याबद्दलचा अनुभव नव्हता म्हणून एकनाथ शिंदेंना जबाबदारी द्यावी हे सांगितल्यानंतरही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले. ९ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये याला स्थगिती मिळाली. ५ मेला आरक्षण रद्द करण्यात आले.
---
२,१०० मुलांचे भवितव्य अंधारात
यावेळी नरेंद्र पाटील यांनी एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मुद्दा छेडला. आरक्षणामुळे चांगला फायदा असा झाला होता की, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुले याठिकाणी एमपीएससी परीक्षेत भाग घेऊन पास झाले आणि कामाला लागले; परंतु महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये ज्या एमपीएससीच्या परीक्षा झाल्या. त्याचे निकाल आल्यानंतर कामावर जाण्यासाठी त्यांना पत्र दिले गेले नाही. पर्यायी सप्टेंबर महिन्यानंतर त्या मुलांना नोकरी मिळाली नाही आणि आता आरक्षणही रद्द झाले आहे. एमपीएससीच्या माध्यमातून २,१०० मुलांचे भवितव्य अजूनही अंधारात असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.
--
३० जून रोजी बार्शीत बैठक
आक्रोश मोर्चाच्या तयारीसाठी बार्शीत ३० जून रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला व ४ जुलैच्या सोलापूर येथील मोर्चाला मराठा समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
----
फोटो : २७ नरेंद्र पाटील
४ जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बार्शीत राजेंद्र राऊत यांच्याशी चर्चा करताना आमदार नरेंद्र पाटील.