सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही नवरात्र यात्रा रूपाभवानी मंदिरात भरणार नाही़ मात्र मंदिरातील नित्योपचार पूजा, धार्मिक विधी याचे ऑनलाइन दर्शन भाविकांना घर बसल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रूपाभवानी मंदिरात पोलिस प्रशासन, मंदिर समितीचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़ यावेळी मंदिर समितीचे ट्रस्टी मल्लिनाथ मसरे, पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर, मंदिराचे पुजारी राजू पवार, संजय पवार, मल्लिनाथ लातूरे, बाळासाहेब मुस्तारे, जगन्नाथ बंडगर, संताजी भोळे, रावसाहेब चौगुले, सर्जेराव भोसले, शिवगंगा मंदिराचे रमेश वर्देकर, संतोष वर्देकर, नागनाथ गायकवाड, इंद्रजित गायकवाड यांच्यासह पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते़ मंदिर परिसरात नवरात्रोत्सवात मोठा बंदोबस्त राहणार आहे. मंदिराच्या दिशेने येणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहेत.
परिसरामध्ये कुठेही दुकान स्टॉल राहणार नाही, तसेच भाविकांना मंदिरात दर्शन बंद राहील पण मंदिर समितीच्यावतीने आॅनलाइन दर्शनाची सोय करण्यात येणार आहे़ घरबसल्या ठिकाणी भाविकांना याचा लाभ घेता येणार आहे. पुजारी यांना नित्योपचार पुजा अर्चा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे़ या नवरात्रोत्सव काळात भाविकांनी मंदिर समिती, पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.