सोलापूर : पावसाळ्यात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या वतीने आॅगस्टअखेर कृषी महोत्सवाच्या धर्तीवर वृक्ष महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवादरम्यान नागरिकांना दहा हजार रोपांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उद्यान विभागप्रमुख निशिकांत कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत महापालिका ३० हजार झाडे लावणार आहे. वन विभागाच्या नर्सरीतून दोन ते तीन फूट उंचीची दहा हजार झाडे घेण्यात आली आहेत. रामवाडी आणि परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली असून शहराच्या विविध भागात लावण्याचे काम सुरू होणार आहे. याशिवाय उद्यान विभागाने आठ ते दहा फूट उंचीची आणखी १५ हजार झाडे खरेदीची निविदा काढली आहे. १५ आॅगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. दरम्यान, शासनाने महापालिकांच्या स्तरांवर वृक्ष महोत्सव आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहरात वृक्ष महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन उद्यान विभागाने सुरू केले आहे. मनपाच्या जागेत हा महोत्सव होईल.
यात शहर आणि जिल्ह्यातील नर्सरीमधील रोपे ठेवण्यात येणार आहेत. वृक्ष लागवड आणि संवर्धनाबाबत काम करणाºया संस्थांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना मागणीनुसार आवश्यक ती रोपे अल्प दरात खरेदी करता येतील. या महोत्सवाचा प्रस्ताव मनपा आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. पर्यावरण प्रेमी व्यक्तींनी मनपाला दहा हजार रोपे मोफत देण्याची तयारी दाखविली आहे. ही रोपे नागरिकांना भेट देण्यात येणार आहेत. शहरातील इतर पर्यावरण प्रेमी संस्थांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. उद्यान विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन कांबळे यांनी केले आहे.
शहराला हरित आच्छादित प्रदेश करा- उद्यान विभागप्रमुख निशिकांत कांबळे म्हणाले, नागरिकांनी झाडे लावताना संरक्षक भिंतीपासून चार फूट अंतरावर लावावीत. वाहतुकीला अडथळा होऊ नये, वीज वितरण तारांपासून ठराविक अंतर असावे याची काळजी घ्यावी. अंगणात झाड लावणार असाल तर कडूलिंब, बकूळ, पिवळा चाफा, बहावा, हिरडा, केशर आंबा, जंगली आवळा आदी वृक्षांची लागवड करावी. यंदाच्या पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करुन सोलापूर शहराला हरित आच्छादित प्रदेश करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.