सोलापूर : महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने बुधवारी घेतला.यामुळे आता एका प्रभागात तीन नगरसेवक राहणार आहेत. या प्रक्रियेत अपक्षांऐवजी पक्षाचेच वर्चस्व राहील. त्यामुळे सर्व पक्षांच्या नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
राज्य निवडणूक आयोगाने २५ ऑगस्ट प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दिले. यात एक वॉर्ड-एक नगरसेवक या पद्धतीने निवडणुका होतील, असे सांगण्यात आले, परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका अपेक्षित आहेत. लवकरच मंत्रिमंडळात निर्णय होईल, असे सांगितले होते. पालिका आयुक्तांनी प्रभाग रचनेचे काम सुरू केले आहे. पालिकेच्या २००२ पासूनच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने झाल्या आहेत. १९९७ ची निवडणूक एक सदस्यीय पद्धतीने झाली. यात अपक्षांचा बोलबाला राहिला होता. काँग्रेसला अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करावी लागली. शिवाय अपक्ष म्हणून निवडून आलेल्या संजय हेमगड्डी यांना महापौरपद द्यावे लागले होते.
-----------
बहुसदस्यीय पद्धतीबद्दल नेत्यांचे मत
- उमेदवारीसाठी बड्या कार्यकर्त्यालाही पक्षनेतृत्वाचे उंबरठे झिजावे लागतील. पक्षाचे नेते उमेदवार निश्चित करताना एक तगडा किंवा दुसरा दुर्बल उमेदवारही निवडून आणू शकतील.
- अनेक प्रभागात लोक पक्षाकडे पाहूनच मतदान करतील. बंडखोरीची डोकेदुखी कमी होईल.
- महाआघाडीतील नेत्यांचा भाजपविरुद्ध तीन पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न आहे. किमान राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्यास मदत होईल, असे नेते सांगतात.
------------
महापालिकेत बहुसदस्यीय पद्धत ठेवण्याची मागणी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. खरे तर मी दररोज काम करतो. त्यामुळे मला एक असो वा बहुसदस्यीय पद्धतीचा फरक पडत नाही, परंतु जास्तीत जास्त महिला सदस्य निवडून आणण्यासाठी बहुसदस्यीय पद्धत आवश्यक होती.
- आनंद चंदनशिवे, गटनेता.
----
बहुसदस्यीय पद्धतीमुळे अपक्षाला वाव राहणार नाही. पक्षाला महत्त्व राहील. काँग्रेसकडे सर्वच प्रभागात सक्षम उमेदवार आहेत. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आगामी महापौर काँग्रेसचाच असेल.
- प्रकाश वाले, शहराध्यक्ष, काँग्रेस.
एक वा बहुसदस्यीय पद्धत एमआयएमला फायदेशीरच आहे. या निर्णयात बंडखोरी कमी होईल. एखाद्या नव्या उत्साही कार्यकर्त्यावरही अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्याला दुर्बल उमेदवारासाठी वेळ घालावा लागणार. पण आगामी निवडणुकीत एमआयएम किंगमेकरच असेल.
- रियाज खरादी, गटनेता, एमआयएम.