सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना राजी करण्यापासून ते जिल्हा व सीमावर्ती भागातील शिवाचार्यांना एकत्र करून भक्तांची मोट बांधण्याचे काम नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी व मैंदर्गी संस्थान हिरेमठाचे मठाधिपती नीलकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी केले. यामुळेच राजकीय नेत्यांबरोबरच तेही जयसिद्धेश्वरांच्या विजयात पडद्यामागील सूत्रधार आहेत.
निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना उमेदवारी मिळावी यासाठी श्रीकंठ शिवाचार्य व नीलकंठ शिवाचार्य यांनी पुढाकार घेतला. उमेदवारी मिळविल्यानंतर मठात बसून प्रबोधन आणि नियोजन करण्याबरोबरच थेट मतदारसंघात प्रचार यंत्रणा राबवून पिंजूनही काढला. ठिकठिकाणी भक्तांच्या गाठीभेटी घेतल्या.
महास्वामींना मतदान करण्याचे आवाहनही भक्तांना केले. एरव्ही पूजा, विधीसाठी भक्तांच्या घरी जाणारे हे दोन्ही शिवाचार्य मात्र जयसिद्धेश्वर शिवाचार्यांसाठी पदरमोड करून कर्नाटक, मुंबई, पुणे, हैदराबादची वारी करून तेथील भक्तांना ‘मतदान करण्यासाठी गावी या, लोकशाही बळकट करा’ असे आवाहन केले. यामुळे भक्त, सांप्रदायिक माणसे, अध्यात्म जीवींबरोबरच अन्य मतदार आकर्षित झाल्याने महास्वामींच्या मताधिक्यात वाढ झाली.
...अन् जगद्गुरूंचा संदेशमाजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी होटगी मठात जाऊन धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांची भेट घेऊन चर्चा केली. यामुळे भक्तांमध्ये वेगळा संदेश जाईल, हे जाणून तत्काळ नीलकंठ शिवाचार्य व श्रीकंठ शिवाचार्य यांनी श्रीशैल पीठाचे जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम शिवाचार्य यांना होटगी मठात बोलावून भक्तांबरोबरच डॉ. जयसिद्धेश्वर व डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्यांना एकत्र राहण्याचा संदेश देण्यास भाग पाडले.