सांगोला : थकीत घरभाडे मागणाऱ्या वृद्ध मालकाला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन स्मशानभूमीत नेऊन जाळून मारण्याची धमकी देत जबरदस्तीने कोऱ्या बाँडवर सह्या घेतल्या. हे प्रकरण मिटविण्यासाठी २० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी एका राजकीय संघटनेचा पदाधिकारी कडूबा निवृत्ती खरात (रा.एखतपूर रोड, सांगोला), पाराप्पा संभाजी ढावरे (रा.वासूद ता.सांगोला), विनोद पोपट ढोबळे (रा.बनकरवस्ती, सांगोला) यांच्यासह एक अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अन्य तिघांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
एखतपूर येथील निवृत्त शिक्षक शिवाजी नवले यांच्या अष्टविनायक अपार्टमेंटमध्ये कडूबा निवृत्ती खरात व पाराप्पा संभाजी ढावरे हे दोघे भाड्याने राहतात. त्यांचे घरभाडे थकीत राहिले होते. १९ फेब्रुवारी रोजी कडूबा खरात व पाराप्पा ढावरे यांनी अपार्टमेंट मालकास फोन करून मार्केट यार्डासमोर बोलवून घेतले. यावेळी त्यांनी आणखी पाच साथीदारांना बोलावून घेतले. ‘तू माझ्या पत्नीला फोन का करतो, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो’ असे धमकावत नवले यांना मारहाण केली. त्यानंतर नवले यांचे अपहरण करून जबरदस्तीने टेम्पोत बसवून स्मशानभूमीत घेऊन गेले. तेथे लाकडी दांडक्याने मारहाण करून जाळून टाकण्याची धमकी दिली. हे प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपये खंडणी आणि एक फ्लॅट नावावर करून देण्याची मागणी केली. त्यानंतर नवले यांच्याकडून फोन पे वरून दोन हजार रुपये काढून घेतले. एवढ्यावरच न थांबता नवले यांना जबरदस्तीने त्याच टेम्पोतून फुले चौकात आणले. तेथे बाँड खरेदी केला. पंढरपूर रोडवरील एका हॉटेलमध्ये नेऊन दारूसाठी पैसे घेत खंडणी मागितली. त्यांनी शिवाजी नवले यांचा मुलगा राजेंद्र यास फोन करून त्याच्याकडे हे प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपये मागितल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
दरम्यान पोलिसांनी कडूबा खरात, ढोबळे, ढावरे यांच्यासह चौघांविरुद्ध दरोडा, अपहरण व ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला.
---
गुन्ह्यातील साहित्य जप्त
सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर याच्या पथकाने आरोपी कडूबा निवृत्ती खरात, पाराप्पा संभाजी ढावरे, विनोद पोपट ढोबळे यांना अटक केली. इतर चार अनोळखी आरोपींपैकी एकाला ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेला छोटा हत्ती, लाकडी दांडके, मोबाईल, पैसे असे साहित्य जप्त केले आहे.
---
यांनी बजावली कामगिरी
या प्रकरणाची पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी गांभीर्याने दखल घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नागेश यमगर, हवालदार पठाण, वजाळे, पोलीस सचिन देशमुख, भाऊसाहेब देशमुख, धनंजय इरकर, पकाले यांनी ही कारवाई केली.
-----
या आरोपींपैकी कडूबा खरात हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. इतर आरोपींचे रेकॉर्ड तपासून त्यांच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का याची माहिती गोळा केली जात आहे. त्यानंतर त्यांच्यावर तडीपार, मोक्काची कारवाई केली जाईल.
- भगवान निंबाळकर
पोलीस निरीक्षक, सांगोला पोलीस ठाणे