सोलापूर : वऱ्हाडी म्हणून लग्नामध्ये आलेल्या तीन अनोळखी महिलांनी नवरीसाठी आणलेल्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारत तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. हा प्रकार करमाळ्यातील (जि. सोलापूर) नालबंद मंगल कार्यालयात घडला.
करमाळा येथील गणेश गवळी यांचे साडू रामचंद्र हारमोडे (रा. कळंब, ता. इंदापूर, जिल्हा पुणे) यांचा मुलगा विशाल हारमुडे यांचा विवाह करमाळा येथील राजेंद्र घोरपडे यांच्या मुली सोबत नालबंद मंगल कार्यालय येथे असल्याने हारमोडे यांनी नववधूस लग्नात घालण्यासाठी दागिने आणले होते. जवळपास १ लाख ३५ हजार रुपयांचे दागिने हे नवरदेव पारण्यासाठी गेल्यानंतर लग्न मंडपातच एका पिशवीत ठेवले होते. काही काळानंतर सोने चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर शोधाशोध करण्यात आली. यावेळी संशयित अनोळखी महिला त्या परिसरात फिरत असल्याचेही बऱ्याच जणांच्या लक्षात आले होते. शिवाय मंगल कार्यालय पासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही मध्येही ती महिला घाई गडबडीत तेथून निघून जात असताना दिसत आहे. त्या महिलेचा शोध पोलिस घेत आहेत.